निकृष्ट काम भोवले; सातारा पालिकेचा ठेकेदाराला दणका, १६ लाखांची अनामत जप्त

By सचिन काकडे | Updated: May 21, 2025 13:40 IST2025-05-21T13:39:31+5:302025-05-21T13:40:11+5:30

सातारा : वारंवार सूचना करूनही गटाराचे निकृष्ट काम करणाऱ्या एका ठेकेदाराला सातारा पालिका प्रशासनाने जोरदार दणका दिला. संबंधित ठेकेदाराची ...

Satara Municipal Administration seizes deposit of Rs 16 lakhs from contractor who did Poor work | निकृष्ट काम भोवले; सातारा पालिकेचा ठेकेदाराला दणका, १६ लाखांची अनामत जप्त

निकृष्ट काम भोवले; सातारा पालिकेचा ठेकेदाराला दणका, १६ लाखांची अनामत जप्त

सातारा : वारंवार सूचना करूनही गटाराचे निकृष्ट काम करणाऱ्या एका ठेकेदाराला सातारा पालिका प्रशासनाने जोरदार दणका दिला. संबंधित ठेकेदाराची १६ लाख ७४ हजार ५०६ रुपयांची अनामत रक्कम प्रशासनाने जप्त केली असून, यापुढे पालिकेच्या निविदा प्रकियेत सहभागी होण्यासही निर्बंध घालण्यात आले आहेत.

मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, सातारा पालिका अंतर्गत पॅरेंट्स स्कूल ते रामराव पवार नगर या मार्गावर गटाराचे काम प्रस्तावित करण्यात आले होते. सुमारे दीड हजार मीटर लांबीच्या गटारासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून १ कोटी ३८ लाख ८६ हजार ४०८ इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली होती.

ठेकेदार कुणाल गायकवाड यांनी सर्वांत कमी दराने या कामाची निविदा भरली होती. यावेळी प्रशासनाकडून कमी दरात गुणवत्तापूर्ण काम कसे करणार याबाबत ठेकेदार गायकवाड यांना लेखी पत्राद्वारे विचारणा करण्यात आली होती. यावेळी त्यांनी पालिकेला पत्र देऊन गुणवत्तापूर्ण काम करण्याची हमी दिली होती.

कामाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर ठेकेदार यांनी सुमारे ५४० मीटर आरसीसी गटाराचे काम पूर्ण केले. उर्वरित काम अत्यंत संथ गतीने सुरू होते. पालिकेकडून या कामाची वेळोवेळी पाहणी केली असता त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे ठेकेदाराला त्रुटी दूर करून उच्च दर्जाचे काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या.

तरीदेखील कामात कोणतीही सुधारणा न झाल्याने पालिकेने १७ फेब्रुवारी २०२५ रोजी संबंधित ठेकेदाराकडून काम काढून घेतले. तसेच त्याने भरलेली बयाणा व सुरक्षा अनामत रक्कम १६ लाख ७४ हजार ५०६ रुपये जप्त करण्यात आली. संबंधित ठेकेदाराने अन्य एक निविदा मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून कार्यालयाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने पालिकेच्या निविदा प्रक्रियेत त्यांना सहभागी होण्यासही निर्बंध घालण्यात आल्याचे पत्रकात नमूद केले आहे.

Web Title: Satara Municipal Administration seizes deposit of Rs 16 lakhs from contractor who did Poor work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.