Satara Flood: कराडला कृष्णाबाई मंदिरात पाणी; २१ कुटुंबांचे स्थलांतर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 19:11 IST2025-08-21T19:11:32+5:302025-08-21T19:11:54+5:30
कराड : गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे कृष्णा-कोयना नद्यांची पातळी वाढली आहे. त्याचा फटका नदीकाठच्या गावांना बसला ...

Satara Flood: कराडला कृष्णाबाई मंदिरात पाणी; २१ कुटुंबांचे स्थलांतर!
कराड : गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे कृष्णा-कोयना नद्यांची पातळी वाढली आहे. त्याचा फटका नदीकाठच्या गावांना बसला आहे. कराडचे ग्रामदैवत कृष्णाबाई मंदिरातही पाणी शिरले आहे. तर दक्षतेचा उपाय म्हणून शहरातील २१ कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
कराडला कृष्णा व कोयना नदीचा प्रीतिसंगम आहे. त्यामुळे या दोन्ही नद्यांतून येणारे पावसाचे पाणी, त्यातच कोयना धरणातून सुरू असणारा पाण्याचा विसर्ग, यामुळे नद्यांनी आपली पातळी ओलांडली आहे. शहरातील दत्त चौकातील साई मंदिराच्या आवारात, त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी ओपन जिममध्ये पाणी गेले आहे. त्याचबरोबर नदीकाठच्या लिंगायत समाजभूमीतही पावसाचे पाणी आले आहे. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणा सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर वेळोवेळी या सगळ्या बाबींची माहिती घेत आहेत.
तीनशेच्यावर गणेशमूर्तींचे स्थलांतर..
पाण्याची पातळी वाढू लागल्याने मंगळवारी पत्र्याची चाळ येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बनवण्यात येणाऱ्या गणेशमूर्तींना धोका निर्माण झाला. या मूर्ती हलविण्याच्या प्रशासनाने सूचना केल्या. त्यावेळी कुंभार समाजाच्या मदतीला शहरातील दोनशेच्यावर तरुण धावून गेले. त्यांनी येथील गणपतीच्या मूर्ती सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी मदत केली. तर आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या वतीनेही मोठ्या मूर्ती उचलण्यासाठी क्रेन आणि ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात आले होते.
त्या कुटुंबांचे शाळांमध्ये स्थलांतर..
शहरातील पूरस्थिती लक्षात घेऊन सुमारे २१ कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामध्ये पत्राचाळीतील ११ तर पाटण कॉलनीतील १० कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले असून, या कुटुंबांना नगरपालिका शाळा नंबर २, ३ व ११ या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.