satara district bank election : जिल्हा बँक ठरली असंतोषाची जननी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 12:14 PM2021-11-25T12:14:38+5:302021-11-25T18:39:10+5:30

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल लागला आणि बालेकिल्ला असलेल्या राष्ट्रवादीमधील नाराजी समोर आली. कोण निवडणूक आलं, यापेक्षा कोणाचा करेक्ट गेम केला याचाच आनंद राष्ट्रवादीतील काही नेत्यांना झाल्याचे दिसून आले. त्यावरून आता जिल्ह्यातील पुढील राजकारणाची नीती आणि रणनीती ठरणार, हे निश्चित

satara district bank election District bank Policies and strategies for further politics in the district | satara district bank election : जिल्हा बँक ठरली असंतोषाची जननी

satara district bank election : जिल्हा बँक ठरली असंतोषाची जननी

googlenewsNext

दीपक शिंदे

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँक खूप सचोटीने आणि चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या राजकीय नेत्यांनी बँकेच्या माध्यमातून आपल्या मनातील खदखद मोकळी केली आहे. त्यामुळे भविष्यात कोणाच्या मनात काय होते याची जाणीवही एकमेकांना झाली आहे. अनेक राजकीय कुरघोड्या आणि कोलांट उड्या या बँकेत पाहायला मिळाल्या. राजकारणाचे विविध रंग आणि रंगांचा झालेला बेरंगही पाहायला मिळाला. त्यावरून आता जिल्ह्यातील पुढील राजकारणाची नीती आणि रणनीती ठरणार, हे निश्चित.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नेतृत्व रामराजे नाईक निंबाळकर करीत असले तरी सध्या या ठिकाणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशिवाय पान हालत नाही. त्यामुळे जिल्हा बँकेत त्यांच्याशिवाय जाता येणारच नव्हते. याची जाणीव झाल्यानेच बँकेत पक्ष नाही आणि सर्वपक्षीय आघाडी करणार, असा कांगावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला. पण प्रत्यक्षात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना वगळता कोणत्या पक्षाला आणि लोकांना संधी मिळाली हे सर्वांनी पाहिलेच आहे. त्यामुळे बँकेत आता अध्यक्षपदासाठीदेखील शिवेंद्रसिहराजे भोसले यांना वगळून वेगळा विचार करताच येणार नाही. केला तर तो शिवेंद्रसिंहराजेंना विचारात घेवूनच करावा लागेल. त्यांच्या सहमतीशिवाय कोणालाच पुढे जाता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी बँकेत आणि साताऱ्याच्या राजकारणातही आपला एक दरारा निर्माण करून ठेवला आहे. त्यामुळेच सध्या कोणालाही टक्कर देण्याची त्यांची तयारी आहे.

सातारा - जावळी मतदारसंघातील काही जागा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बिनविरोध करून घेतल्या. ज्या ठिकाणी अडचणी आल्या तिथे निवडणूक लागली. पण पॅॅनेल असो किंवा पक्ष, आपलाच कार्यकर्ता निवडून आला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. तसा त्यांचा प्रत्येक कार्यकर्त्यावर जीव आहे आणि कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी त्यांचे नियोजनही असते. ज्ञानदेव रांजणे हे अलीकडे जावलीत निर्माण झालेले नेतृत्व असले तरी पुढील काळात ते अनेक बाबतीत लाभदायक ठरणार असल्यानेच शिवेंद्रराजेंनी त्यांना ताकद दिली. त्यांनी अनेकदा शशिकांत शिंदे यांना जावळीत चुळबूळ करू नका, असे वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी तो ऐकला नाही. त्यामुळे आपल्या अस्तित्वासाठी शिवेंद्रसिंहराजेंना लढा उभारणे आवश्यक होते. त्यांनी तो उभारला आणि यशस्वीपणे जिंकलाही.

शशिकांत शिंदे हे यापूर्वी जावळीतून बँकेवर निवडून जात होते. अलीकडच्या तीन निवडणुका कोरेगावमधून लढल्यामुळे त्यांना आता जावळीवरचा दावा सोडला पाहिजे, असा मतप्रवाह होता. पण शशिकांत शिंदे यांची त्यासाठी तयारी नव्हती. हक्काची काही मते आहेत ती आपल्याला मिळतीलच, असा त्यांना विश्वास होता. शिवाय सहकार पॅनेल अडचणी आल्या तर मदत करील, अशीही अपेक्षा होती. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत ते गोड गैरसमजात राहिले. थोडे काम केले, पण आकडेवारीत थोडे कमी पडले. आता पुढील काळात ते अधिक सतर्कपणे राजकारण करतील अशी अपेक्षा आहे. जावळीवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे कोरेगावमध्ये लक्ष देता आले नाही. त्यामुळे त्या ठिकाणीही बरेच राजकारण झाले. टप्प्यातील जागा हातातून गेली. राष्ट्रवादीच्या किंवा सहकार पॅनेलच्या इतर कोणत्याही नेत्यांनी कोरेगावात फार लक्ष घातले नाही. काही जागा बिनविरोध झाल्यानंतर नेते निवांत झाले.

वाईत सेफ गेम..

वाई विधानसभा मतदारसंघात विराज शिंदे यांना शांत करून मकरंद पाटील यांनी पहिल्या डावातच खेळ खल्लास केला. माघार घेण्याच्या दिवशी इतरांनी माघार घेतल्याने नितीन पाटील यांचा अर्ज कायम राहिला आणि त्यांना बिनविरोध करण्यात यश आले. त्यापूर्वी अगोदरच मकरंद पाटील आणि राजेंद्र राजपुरे यांची बिनविरोध निवड झाली होती.

माणमध्ये मतांचा हिशोबच जुळेना...

माण खटावमधील गणित तर पूर्ण चुकले. शेखर गोरे यांचा दोन जागांवर अर्ज होता. प्रदीप विधातेंविरोधातची लढाई त्यांच्यासाठी सोपी नव्हती, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे त्यांनी मनोज पोळ यांच्याविरोधातील जागेवर ताकद लावण्याचा निर्णय घेतला. त्यातच जयकुमार गोरे यांनी माघार घेतली होती. पण ती कोणासाठी होती आणि त्यांचा किती फायदा होणार हे, शेवटपर्यंत आणि नंतरही अनेकांना कळलेच नाही. सर्वजण गणिते लावत बसले, राष्ट्रवादीची मते फुटली, की जयकुमार गोरेंची मदत झाली नाही. सहकार पॅनेल आणि शेखर गोरे या दोघांनीही अखेरपर्यंत प्रयत्न केले. पण कोणाच्या हातात किती पडले याचा यशावकाश आढावा घेण्याची आवश्यकता आहे.

Web Title: satara district bank election District bank Policies and strategies for further politics in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.