HSC Exam Result 2025: सातारा जिल्ह्याचा टक्का घसरला, ९२.७६ टक्के निकाल लागला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 15:55 IST2025-05-06T15:54:44+5:302025-05-06T15:55:51+5:30
सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल दि. ५ रोजी जाहीर झाला. सातारा जिल्ह्याच्या ...

संग्रहित छाया
सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल दि. ५ रोजी जाहीर झाला. सातारा जिल्ह्याच्या निकालात गेल्यावर्षीच्या तुलनेत काहीशी घट झाली असून यंदा ९२.७६ टक्के निकाल लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही बारावीच्या परिक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यात ९६.५६ टक्के मुली उत्तीर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा दि. ११ फेब्रुवारी त १८ मार्चदरम्यान घेण्यात आली. यामध्ये सातारा जिल्ह्यात ३०३ कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांची ५२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली होती. सातारा जिल्ह्यात नियमित विद्यार्थ्यांमध्ये नोंदणी केलेले ३३ हजार ३४६ विद्यार्थ्यांपैकी ३३ हजार १५२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३० हजार ७५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर निकाल ९२.७६ टक्के निकाल लागला.
पुन:प्रविष्ठ विद्यार्थ्यांमध्ये सातारा जिल्ह्यातून १ हजार ९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १०८१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ५३१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ४९.१२ टक्के निकाल लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेचा टक्का चांगला आहे. विज्ञान शाखेसाठी १८ हजार ३२१ विद्यार्थ्यांची नोंदणी होती. त्यापैकी १८ हजार २८८ विद्यार्थी बसले. त्यामधील १८ हजार ४३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९८.६६ टक्के निकाल लागला. कला शाखेसाठी ७ हजार ४११ विद्यार्थ्यांची नोंदणी होऊन ७ हजार २९४ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यातील ५ हजार ६२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ७७.०९ टक्के निकाल लागला.
वाणिज्य शाखेतून ६ हजार ३८० विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी ६ हजार ३४९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामध्ये ५ हजार ९८३ विद्यार्थी उत्तीर्ण होवून ९४.२३ टक्के निकाल लागला आहे. व्यावसायिक शाखेसाठी ९१५ विद्यार्थ्यांची नोंदणी होती. त्यापैकी ९०७ विद्यार्थी बसले तर ८४२ विद्यार्थी उत्तीर्ण होवून ९०.८४ टक्के निकाल लागला. आयटीआयसाठी ३९८ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली तर ३१४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २८१ विद्यार्थी उत्तीर्ण होवून ८९.४९ टक्के निकाल लागला आहे.