कार उभ्या ट्रकला धडकली, दोन महिलांचा मृत्यू; ईदच्या खरेदीसाठी पुण्याला जाताना अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 15:54 IST2025-03-09T15:54:17+5:302025-03-09T15:54:52+5:30

या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. हा अपघात रविवार, दि. ९ रोजी सकाळी नऊ वाजता झाला.

Satara Car hits parked truck, two women die; Accident while going to Pune for Eid shopping | कार उभ्या ट्रकला धडकली, दोन महिलांचा मृत्यू; ईदच्या खरेदीसाठी पुण्याला जाताना अपघात

कार उभ्या ट्रकला धडकली, दोन महिलांचा मृत्यू; ईदच्या खरेदीसाठी पुण्याला जाताना अपघात

सातारा : साताऱ्यातून ईदच्या खरेदीला पुण्याला जाताना पाचवडजवळ महामार्गालगत उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून कारने भीषण धडक दिली. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. हा अपघात रविवार, दि. ९ रोजी सकाळी नऊ वाजता झाला.

नाहीद जमीर शेख (वय ३८, रा. शनिवार पेठ, सातारा), सलमा इरफान मोमीन (४१, रा. सांगली), अशी अपघातात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत तर कैफ इरफान मोमीन (१४), इरफान इकबाल मोमीन (४०, दोघेही रा. सांगली), बशीर महामूद शेख (७३, रा. शनिवार पेठ, सातारा), चालक सलमान मोहम्मद पठाण (२३, रा. मेढा, ता. जावळी), अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

साताऱ्यात शनिवार पेठेत राहणाऱ्या साहिल शेख यांच्याकडे सांगलीत राहणारी त्यांची बहीण सलमा व त्यांचे पती आणि दोन मुलांसमवेत त्या शुक्रवारी आल्या होत्या. ईद काही दिवसांवर असल्याने ईदच्या खरेदीसाठी मोमीन आणि शेख कुटुंबीयांनी पुण्याला जायचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी मेढ्यावरून कार बोलावली. रविवारी सकाळी सर्व जण कारने पुण्याला निघाले. पाचवड, ता. वाईजवळ गेल्यानंतर महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला कारची पाठीमागून जोरदार धडक बसली. 

हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील दोन्ही महिला गाडीतून बाहेर फेकल्या गेल्या. त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि हाता-पायाला गंभीर जखमा झाल्या. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील इतर प्रवासीसुद्धा जखमी झाले. या अपघातानंतर जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. अपघातात दोन्ही महिलांचा मृत्यू झाल्याचे समजताच साताऱ्यातील नातेवाइकांनीजिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. नातेवाइकांनी केलेला आक्रोश अक्षरश: काळीज पिळवटून टाकणारा होता. या अपघाताची भुईंज पोलिस ठाण्यात अद्याप नोंद झाली नव्हती.

ओव्हरटेक करताना अपघात.. -
चालक सलमान पठाण हा कार वेगात चालवत होता. महामार्गालगत ट्रक उभा आहे. हे दिसत असतानाही त्याने  ओव्हरटेक करत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. चालकाची बाजू त्याने थोडीफार वाचवली. कट मारल्यामुळे पाठीमागे बसलेल्या महिला बाहेर फेकल्या गेल्या. मात्र, चालक नाट्यमयरीत्या अपघातातून बचावला. कारच्या उजव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे.   

Web Title: Satara Car hits parked truck, two women die; Accident while going to Pune for Eid shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.