सातारा : मध्यप्रदेशातील महाराजांचा अपघाती मृत्यू, चार शिष्य जखमी, टँकरला ओव्हरटेक करताना कार उलटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 18:54 IST2018-01-19T18:50:36+5:302018-01-19T18:54:25+5:30
खटाव तालुक्यातील धोंडेवाडी येथे गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास टँकरला ओव्हरटेक करत असताना कार चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटली. यात मध्यप्रदेशामधील श्रीराम समर्थ कुटी आश्रमाचे श्रीराम महाराज रामदासी (मूळ रा. गोंदवले, ता. माण) यांचा मृत्यू झाला.

सातारा : मध्यप्रदेशातील महाराजांचा अपघाती मृत्यू, चार शिष्य जखमी, टँकरला ओव्हरटेक करताना कार उलटली
वडूज (सातारा) : खटाव तालुक्यातील धोंडेवाडी येथे गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास टँकरला ओव्हरटेक करत असताना कार चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटली. यात मध्यप्रदेशामधील श्रीराम समर्थ कुटी आश्रमाचे श्रीराम महाराज रामदासी (मूळ रा. गोंदवले, ता. माण) यांचा मृत्यू झाला.
याबाबत माहिती अशी की, मध्यप्रदेशला जाण्यासाठी गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कारमधून (एमएच १३ सीयू १३१३) ते निघाले होते.
दरम्यान, धोंडेवाडी येथे नवीन महावितरण उपकेंद्रानजीक टँकरला ओव्हरटेक करत असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटली. या अपघातात कारमधील त्यांचे चार शिष्यही जखमी झाले.श्रीराम महाराज रामदासी यांना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा त्यांचे पार्थिव मध्यप्रदेशमधील बडवाह या गावी नेण्यात आले. खेडीघाटमध्ये श्रीराम समर्थ कुटी आश्रमाचे ते संस्थापक होते. त्यांचे मध्यप्रदेश व देशभरात अनेक ठिकाणी भक्त आहेत. त्यांचे मूळगाव गोंदवले, ता. माण आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. अधिक तपासासाठी वडूज पोलिस ठाण्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.