सातारा : तिजोरीच्या ड्रॉव्हरसह ३० तोळे सोन्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 16:59 IST2018-06-25T16:58:38+5:302018-06-25T16:59:42+5:30
शिवथर येथील निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात घुसून चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री घरफोडी केली. दरम्यान, तिजोरीचे कुलूप तुटत नसल्याने चोरट्यांनी ड्रॉव्हरच कापले. त्या ड्रॉव्हरसह त्यामध्ये असलेल्या तब्बल ३० तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी श्वानपथकासह घटनास्थळी धाव घेतली.

सातारा : तिजोरीच्या ड्रॉव्हरसह ३० तोळे सोन्याची चोरी
सातारा : शिवथर येथील निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात घुसून चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री घरफोडी केली. दरम्यान, तिजोरीचे कुलूप तुटत नसल्याने चोरट्यांनी ड्रॉव्हरच कापले. त्या ड्रॉव्हरसह त्यामध्ये असलेल्या तब्बल ३० तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी श्वानपथकासह घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत माहिती अशी की, टेलिफोन एक्सचेंजमधून निवृत्त अधिकारी जयवंत महादेव साबळे (वय ६१, रा. शिवथर, ता. सातारा) यांच्यासह घरातील सर्वजण रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर झोपी गेले. दुमजली इमारतीच्या एका खोलीत त्यांची तिजोरी होती. त्या खोलीत कोणीही नव्हते. या खोलीला फक्त कडी लावली होती.
मध्यरात्री पावसामुळे परिसरातील वीज गेली होती. दरम्यान, चोरट्यांनी कडी उघडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी तिजोरी उघडून त्यातील ड्रॉव्हर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ड्रॉव्हर लॉक असल्याने तो उघडता येत नसल्याने चोरट्यांनी तो ड्रॉव्हरच कापून त्याची चोरी केली. त्यामध्ये त्यामध्ये सोन्याचे गंठण, मोहनमाळ, अंगठ्या, सोन्याची चेन, फुले असा लाखो रुपयांचा ऐवज होता.
अंदाजे ६ लाख रुपये किमतीच्या मुद्देमालाची चोरी झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. खंडेराव धरणे, पोलीस निरीक्षक पी. डी. जाधव यांच्यासह श्वानपथकाने तपास करण्यास सुरुवात केली.