Satara Hill Half Marathon: आठ हजार धावपटूंनी अनुभवला सातारी थरार!, सांगलीचा अंकुश हाके तर साताऱ्याच्या साक्षी जडयालने मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 13:19 IST2025-09-15T13:18:17+5:302025-09-15T13:19:26+5:30
८० वर्षांच्या आजोबांची ‘डबल हॅट् ट्रिक’

Satara Hill Half Marathon: आठ हजार धावपटूंनी अनुभवला सातारी थरार!, सांगलीचा अंकुश हाके तर साताऱ्याच्या साक्षी जडयालने मारली बाजी
सातारा : थरार, रोमांच, प्रचंड जिद्द आणि निसर्गाची अनोखी अनुभूती…या सर्वांचा सुरेख संगम साधत साताऱ्याच्या डोंगर-दऱ्यांमध्ये रविवारी १४वी सातारा हिल हाफ मॅरेथॉन उत्साहात पार पडली. देशभरातून आलेल्या तब्बल ८ हजार २०० धावपटूंनी निसर्गाचं आव्हान स्वीकारत २१ किलोमीटरची ही खडतर शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेत पुरुषांच्या गटात सांगलीच्या अंकुश हाके याने, तर महिलांच्या गटात साताऱ्याच्या साक्षी जडयाल हिने प्रथम क्रमांक पटकावला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘सातारा रनर्स फाउंडेशन’कडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला पहाटे ६:३० वाजता पोलिस परेड मैदानावरून सुरुवात झाली. ‘चला जाऊ या सांस्कृतिक वारसा जपू या’ हा संदेश घेऊन धावलेल्या या स्पर्धेचं उद्घाटन जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, जेबीजी डायरेक्टर श्रद्धा मेहता, निशांत माहेश्वरी, रनर्स फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उपेंद्र पंडित, उपाध्यक्ष डॉ. विशाल ढाणे, सचिव डॉ. शैलेश ढवळीकर, रेस डायरेक्टर डॉ. अविनाश शिंदे, मेडिकल डायरेक्टर डॉ. प्रताप गोळे यांच्या उपस्थितीत झाले.
सातारा-कास मार्गावरील यवतेश्वराच्या डोंगरावरून धावताना प्रत्येकाने निसर्गाच्या विहंगम सौंदर्याचा अनुभव घेतला. दाट धुक्याने वेढलेला किल्ले अजिंक्यतारा, हिरवीगार वनराई आणि पावसाचा मनमोहक स्पर्श, हे सारं धावपटूंचा उत्साह द्विगुणित करत होतं. खडतर मार्गावरही थकवा विसरून, केवळ अंतिम ध्येयाचा ध्यास घेऊन धावपटू धावत राहिले. तरुणाईपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन फिटनेस आणि जिद्दीचा आदर्श घालून दिला. आयोजकांसह पालिका, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग व स्वयंसेवकांच्या मदतीने ही स्पर्धा सुरक्षित व यशस्वी पार पडली. ही स्पर्धा केवळ शर्यत नसून, तो जिद्दीचा आणि सामर्थ्याचा एक उत्सव असल्याची भावना धावपटूंनी व्यक्त केली. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे सातारकरांनी दिलेलं प्रोत्साहन. रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून टाळ्यांचा कडकडाट, ढोल-ताशांचा गजर आणि ‘हाऊ इज द जोश’च्या घोषणांनी प्रत्येक धावपटूला नवी ऊर्जा मिळाली. तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच या स्पर्धेत सहभागी होऊन फिटनेस आणि जिद्दीचा आदर्श घालून दिला.
‘सेल्फी’साठी नाही, ‘शूरां’च्या सन्मानासाठी
या मॅरेथॉनमध्ये धावपटूंनी केवळ स्पर्धेपुरता सहभाग न घेता, देशभक्तीचाही संदेश दिला. सैन्यदलाच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या काही धावपटूंनी ‘सेल्फीसाठी नाही, शूरांच्या सन्मानासाठी’ आणि ‘एक पाऊल शूरवीरांसाठी, एक धाव राष्ट्रासाठी’ असे फलक हातात घेतले होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. हातात राष्ट्रध्वज घेऊन धावणाऱ्या अनेक स्पर्धकांनी राष्ट्रप्रेम जागृत केलं.
आकर्षक वेशभूषा आणि अनोखा उत्साह
मॅरेथॉनमध्ये काही स्पर्धकांनी आपल्या अनोख्या वेशभूषेने लक्ष वेधून घेतलं. मिकीमाऊस, स्पायडरमॅन, तात्या विंचू बाहुला, नऊवारी साडी, मावळा आणि वारकरी अशा वैविध्यपूर्ण वेशभूषांमध्ये स्पर्धकांनी सहभाग घेतला. लोककलाकारांनी सादर केलेल्या लावणी आणि नृत्याने वातावरणात आणखी रंग भरले. अनेक धावपटूंनीही वाद्यांवर ठेका धरत आनंद व्यक्त केला.
८० वर्षांच्या आजोबांची ‘डबल हॅट् ट्रिक’
या स्पर्धेतील सर्वात प्रेरणादायी बाब म्हणजे साताऱ्याचे राजाराम पवार या ८० वर्षांच्या आजोबांचा सहभाग. त्यांनी सलग सहाव्यांदा या मॅरेथॉनमध्ये धावत आपली ‘डबल हॅट् ट्रिक’ पूर्ण केली आणि तरुणांपुढे एक नवा आदर्श ठेवला.
पोलिसांचे उत्तम नियोजन
स्पर्धेच्या मार्गावर पोलिसांकडून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या शिवाय आरोग्य पथकाच्या रुग्णवाहिकाही सज्ज होत्या. त्यामुळे अत्यंत खडतर अशी असणारी ही स्पर्धा कोणत्याही अडथळ्याविना पार पडली.
स्वच्छतेचा मूलमंत्र
धावपटूंसाठी ठिकठिकाणी मदतकेंद्र तसेच पाणी, चिक्की, केळी आदींची व्यवस्था करण्यात आली होती. रस्त्यावर पडलेला कचरा स्वयंसेवकांनी तातडीने उचलून स्वच्छतेचा मूलमंत्र दिला.
स्पर्धेतील विजेते व त्यांनी नोंदविलेली वेळ!
पुरुष गट
- प्रथम : अंकुश लक्ष्मण हाके (सांगली) - ०१:१०:०८
- द्वितीय : लव प्रीत सिंग (पंजाब) - ०१:११:०६
- तृतीय : धर्मेंद्र डी (राजस्थान) - ०१:१२:०३
महिला गट
- प्रथम : साक्षी संजय जडयाल (सातारा) - ०१:२९:३५
- द्वितीय : ऋतुजा विजय पाटील (कोल्हापूर) - ०१:३०:५२
- तृतीय : सोनाली धोंडिराम देसाई (कोल्हापूर) - ०१:३३:४२