Satara: 'सह्याद्री' कारखाना निवडणुकीत नवा ट्विस्ट; ९ जणांचे अर्ज वैद्य, मानसिंगराव जगदाळे मात्र अपात्रच
By प्रमोद सुकरे | Updated: March 18, 2025 19:45 IST2025-03-18T19:44:55+5:302025-03-18T19:45:14+5:30
प्रमोद सुकरे कराड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ५ एप्रिल रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ...

Satara: 'सह्याद्री' कारखाना निवडणुकीत नवा ट्विस्ट; ९ जणांचे अर्ज वैद्य, मानसिंगराव जगदाळे मात्र अपात्रच
प्रमोद सुकरे
कराड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ५ एप्रिल रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अनेकांचे अर्ज छाननीत अवैध झाले. पैकी १० जणांनी प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे अपील केले होते. पैकी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष निवास थोरात,उद्योजक बाबुराव पवार यांच्यासह ९ जणांचे अर्ज वैद्य ठरवण्यात आले असल्याचा निकाल प्रादेशिक सहसंचालिका निलिमा गायकवाड यांनी दिला आहे.तर सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांचे समर्थक मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज मात्र अवैध ठरवण्यात आला आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या निवडणुकीत आता नवा टिस्ट निर्माण झाला आहे.
अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुमारे २५ वर्षानंतर होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात आमदार मनोज घोरपडे यांच्यासह इतरांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार अशी चर्चा आहे.
सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीसाठी यंदा तब्बल २५१ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पैकी छाननी मध्ये फक्त २०५ अर्ज शिल्लक राहिले. मात्र अपात्र ठरलेल्या उमेदवारात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण समर्थक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष निवास थोरात ,उद्योजक बाबुराव पवार व माजी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे या मातब्बरांच्या आर्जांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला.
त्यानंतर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात,बाबुराव पवार यांच्यासह ९ जणांनी प्रादेशिक सहसंचालिका निलिमा गायकवाड यांच्याकडे स्वतंत्र अपील दाखल केले होते. तर सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांचे समर्थक मानसिंगराव जगदाळे यांनी देखील स्वतंत्र अपील केले होते. १३ मार्च रोजी पुणे येथे अपिलावर सुनावणी झाली होती. त्याचा निकाल सोमवार दि. १७ रोजी दिला असून त्याची प्रत अपिल दाखल करणाऱ्यांना मंगळवारी मिळाली.त्यात ९ जणांचे अर्ज वैद्य ठेवण्यात आले आहेत.तर एक अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे.
यांचे अर्ज ठरले वैद्य
गट क्रमांक ४- निवास आत्माराम थोरात, श्रीकांत माधवराव जाधव
गट क्रमांक १- प्रतापराव गणपतराव यादव, संदीप यशवंत पाटील
गट क्रमांक २- बाबुराव जगन्नाथ पवार
इतर मागास प्रवर्ग - दिलीप हनुमंत कुंभार ,अधिकराव पांडुरंग माळी
महिला राखीव प्रवर्ग- सिंधुताई दादासो जाधव, जयश्री पृथ्वीराज पाटील