प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण भाग शहरांशी जोडणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:09 IST2025-01-01T12:08:40+5:302025-01-01T12:09:07+5:30
सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदी पदाचा पदभार स्वीकारला

प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण भाग शहरांशी जोडणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ग्वाही
सातारा : राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण भाग शहरांशी जोडून ग्रामीण भाग अधिकाधिक विकास प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण केले जाईल. मंत्रिपदाच्या माध्यमातून राज्यात उठावदार काम करणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
मुंबई येथे मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव (इमारती) संजय दशपुते, मुख्य अभियंता (कोकण) शरद राजभोज, मुख्य अभियंता (मुंबई) राजेंद्र रहाणे यांच्यासह राज्यातील बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, फिरोज पठाण, अक्षय जाधव, ओमकार भंडारे आदी उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी मंत्रालयातील महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. याप्रसंगी शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदी काम करण्याची जबाबदारी सोपवली आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते महत्त्वाचे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात रस्त्याचे जाळे निर्माण केले जाईल. राज्याचा जास्तीत जास्त ग्रामीण भाग शहरांना जोडण्याचा प्रयत्न राहील. राज्यात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे करण्याला प्राधान्य राहील, असे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वाला नेणार
सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले आहे. ते पूर्णत्वाला नेले जाईल. सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यातील विकासकामांना चालना देणार असल्याची माहिती यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.