जनावरांच्या वाहतुकीवर निर्बंध, सातारा जिल्ह्यात लम्पीच्या फैलावामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 17:35 IST2025-07-29T17:35:30+5:302025-07-29T17:35:53+5:30
२८ दिवसांपूर्वीचे लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक

संग्रहित छाया
सातारा : जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा फैलाव वाढत चालल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी साेमवारी गोवर्गीय जनावरांबाबत काही प्रमाणात निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार आता बैलगाडा शर्यत, गोवर्गीय प्राण्यांची वाहतूक आदींसाठी हे निर्बंध असतील. यासाठी संबंधित जनावराला २८ दिवसांपूर्वी लम्पी प्रतिबंधित लसीकरण केलेले असेल, तरच त्यांना वाहतूक, तसेच शर्यतीसाठी योग्य ठरविले जाणार आहे.
सातारा जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वी लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला होता. त्यावेळी वर्षभरातच हजारो जनावरांना लम्पीने गाठले होते. तर दीड हजाराहून अधिक पशुधनाचा बळी गेला होता. त्यानंतर लसीकरण केले गेल्याने मागील दोन वर्षांत लम्पी बाधित जनावरांचे प्रमाण किरकोळ होते. तथापी, मागील दीड महिन्यापासून लम्पीने पुन्हा डाेके वर काढले आहे. बाधित जनावरांचा आकडा दररोज वाढत चालला आहे.
त्याला अटकाव करण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी वरील निर्बंधाचा आदेश काढला आहे. त्यानुसार गोजातीय प्राण्यांची वाहतूक करताना किमान २८ दिवसांपूर्वी त्यांचे लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक गोट पाॅक्स लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, गोजातीय जनावरांचे बाजार भरवणे, बाजारातील खरेदी-विक्री, जत्रा भरविणे, प्रदर्शने, शर्यतीचे आयोजन करतानाही २८ दिवसांपूर्वी जनावरांना लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा दाखल सादर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यातील दीड महिन्यातील स्थिती..
- लम्पी बाधित जनावरे - ७१२
- उपचारानंतर बरी - ४२४
- पशुधनाचा मृत्यू - ३१
- सध्या उपचार सुरू - २५७
जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन शेतकरी, तसेच इतरांनीही करुन प्रशासनास सहकार्य करावे. शेतकऱ्यांनीही आपल्या जनावरांना जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात लसीकरण करून घ्यावे. - डाॅ. दिनकर बोर्डे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन विभाग