सातारा जिल्ह्याला दोन दिवस 'रेड अलर्ट'; घाट परिसरात 'धो-धो'; २६ जुलैपासून 'ऑरेंज अलर्ट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 21:00 IST2025-07-23T20:59:00+5:302025-07-23T21:00:30+5:30
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी राहते

सातारा जिल्ह्याला दोन दिवस 'रेड अलर्ट'; घाट परिसरात 'धो-धो'; २६ जुलैपासून 'ऑरेंज अलर्ट'
नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून आता मुंबई वेधशाळेने २४ आणि २५ जुलै रोजी रेड अलर्ट दिला आहे. यामुळे पश्चिम भागातील घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर २६ आणि २७ जुलैलाही घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट आहे.
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी राहते. तर पश्चिमेकडे धो-धो पाऊस पडत असतो. पण, मागील आठवड्यापासून पश्चिम भागातच पाऊस कमी झाला होता. प्रमुख धरण पाणलोट क्षेत्रातही उघडझाप सुरू होती. असे असतानाच मंगळवारी सायंकाळपासून पश्चिम भागात पाऊस वाढला आहे. तसेच पुढील काही दिवस जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.
मुंबई वेधशाळेच्या अंदाजानुसार दि. २४ आणि २५ जुलै रोजी सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भाग घाट परिसराला रेड अलर्ट दिलेला आहे. तसेच २६ आणि २७ जुलै रोजीही याच घाट परिसरात आॅरेंज अलर्ट आहे. यामुळे पावसाचा जोर वाढणार आहे.