..तर पापी असण्यात आनंद, पुण्यवाणांचे आभार; रामराजे नाईक-निंबाळकराचे जयकुमार गोरेंना प्रतिउत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 18:26 IST2022-02-02T18:22:19+5:302022-02-02T18:26:14+5:30
फलटण : माझ्या ‘पापा’मुळे महाराष्ट्राचे कृष्णा लवादाचे पाणी वाचले. तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व धरणे जी १९९६ च्या पुढे सुरू ...

..तर पापी असण्यात आनंद, पुण्यवाणांचे आभार; रामराजे नाईक-निंबाळकराचे जयकुमार गोरेंना प्रतिउत्तर
फलटण : माझ्या ‘पापा’मुळे महाराष्ट्राचे कृष्णा लवादाचे पाणी वाचले. तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व धरणे जी १९९६ च्या पुढे सुरू झाली. त्यामध्ये उरमोडी, तारळी, जिहे कटापूर हे प्रोजेक्ट आहेत. हे पाप असेल तर ‘पापी’ असण्यात मला आनंद आहे. पुण्यवाणांचे आभार मानतो, असे प्रतिउत्तर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आमदार जयकुमार गोरे यांना दिले आहे.
रामराजेंनी म्हटले की, पुण्यवान लोकप्रतिनिधी जे पुण्य करतात ते मला जमत नाही. माझ्या ‘पापा’मुळे महाराष्ट्राचे कृष्णा लवादाचे पाणी वाचले. तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व धरणे जी १९९६ च्या पुढे सुरू झाली. त्यामध्ये उरमोडी, तारळी, जिहे कटापूर हे प्रोजेक्ट आहेत. हे पाप असेल तर ‘पापी’ असण्यात मला आनंद आहे. पुण्यवाणांचे आभार मानतो.
माण तालुक्यातील सीतामाई घाट रस्त्याचे भूमिपूजन माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते दोन दिवसांपूर्वी झाले होते, यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली होती. या टीकेला रामराजेंनी सोशल मीडियावरून प्रतिउत्तर दिले आहे.
रामराजेंच्या प्रतिउत्तरामुळे पुन्हा एकदा फलटण आणि माणचे राजकारण तापण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या निमित्ताने सभापती रामराजे आणि जयकुमार गोरे एकत्र आल्याच्या वावड्या उठल्या होत्या. जयकुमार गोरे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार घेऊन गप्प बसणे पसंद केले होते. यामुळे, त्यांचे कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले होते. जनतेतपण चलबिचल सुरू झाल्याने बॅकफूटवर गेलेले गोरे यांनी पुन्हा आक्रमकपणा आणण्यासाठी संधीचा शोध घेतला.
शांत बसलेले जयकुमार गोरे यांनी माण तालुक्याचा पाणी प्रश्न हाती घेताना फलटण व माणच्या सीमेवर असणाऱ्या सीतामाई घाट रस्त्याच्या कामानिमित्ताने रामराजेंवर टीका करून त्यांना ललकारले. त्याला तातडीने रामराजेंनी प्रत्युत्तर देऊन आपणही संघर्षाला तयार असल्याचे दाखवून दिले आहे. आपल्यातही तेवढा आक्रमकपणा आहे आणि जशास तसे उत्तर देण्याची तयारी असल्याचे रामराजेंनी एक प्रकारे सूचित केल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसते. यामुळे नजीकच्या काळात दोघांमधील संघर्ष आणखी तीव्र होऊन आरोप-प्रत्यारोपाची नवी मालिका सुरू होण्याची शक्यता आहे.