Satara Politics: मूळ अपक्षाचं असलं तरी मी 'या' पक्षात राहील असेही नाही, रामराजे नाईक-निंबाळकर यांचे सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:39 IST2025-10-20T12:37:47+5:302025-10-20T12:39:36+5:30
'ते राज्यपाल करतील; पण मी होणार नाही'

Satara Politics: मूळ अपक्षाचं असलं तरी मी 'या' पक्षात राहील असेही नाही, रामराजे नाईक-निंबाळकर यांचे सूचक वक्तव्य
फलटण : ‘पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणीसाठी आपण आढावा बैठक बोलावली होती, परंतु कार्यकर्त्यांचा सूर नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकडे झुकला. तुमच्या सगळ्यांच्या मनात पुढे काय?, निर्णय घ्या?, आपण कुठल्या पक्षात जायचे?, या प्रश्नांना उत्तर देताना मी सांगेन आपलं मुळंच अपक्षाचं आहे, तरीही मी कुठल्या पक्षात जाणार नाही, असेही नाही. आपल्या सर्वांसाठी पक्ष गौण आहे,’ असे सूचक वक्तव्य विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
फटलण येथे रविवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, विश्वजीतराजे नाईक-निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना रामराजे म्हणाले, ‘कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडून शब्द पाहिजे. माझं वय झालं, तरी माझं सगळं व्यवस्थित चालू आहे. तुम्ही विचारता मेळाव्यात एवढे लोक गोळा होतात, तर पराभव का होतो. याचं कारण म्हणजे ज्या पद्धतीने प्रशासन, पोलिसांवर दबाव टाकून राजकारण सुरू आहे, कंत्राटदारांची बिले अडवली जात आहेत. त्यामुळे कार्यकर्ते घाबरून तिकडे जात आहेत.
दिवंगत चिमणराव कदम सत्तेत होते त्यानंतर राजे गट सत्तेत होता. पण, आपण सत्तेचा कधी त्रास दिला नाही. सत्ता सत्तेच्या ठिकाणी, निवडणुका निवडणुकीच्या ठिकाणी, पण सध्या सत्तेचा गैरवापर करून प्रशासनाकडून त्रास दिला जात आहे. आता आगामी निवडणुका तुमच्या अस्तित्वाच्या आहेत.’
ते राज्यपाल करतील, पण मी होणार नाही
सध्या विकासाच्या दृष्टीने कोण भेटत नाही. मला स्वतःला काहीच मिळवायचं नाही. त्यांना वाटलं, तर मला राज्यपाल करतील पण मी होणार नाही. कारण, कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाचे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत, सध्या तरी माजी आमदार आणि मी एवढेच राहिलो आहोत.
आता निर्णय घ्याच
गावामध्ये दुष्काळ पडला, म्हणून गाव सोडून चालत नाही आणि नेत्याचा पराभव झाला, म्हणून राजकारण सोडून चालत नाही. आपली कालही निष्ठा आजही निष्ठा आणि उद्याही निष्ठा असणारच आहे. जो निर्णय आपण घ्याल त्या निर्णयाशी सगळे सहमत असतील, पण महाराज आता निर्णय घ्याच, अशी आर्त हाक विजय भोंडवे, अमोल रासकर दीपक पिसाळ, शंभूराज पाटील, माधव जमदाडे, अजित बोबडे, हरिष काकडे, सतीश गावडे यांनी मांडली.
मी फार्म भरतो...
पदवीधर मतदारसंघाच्या नावनोंदणीसाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत रघुनाथराजे यांनी ‘मीच आता फॉर्म भरतो’, म्हणत राजेगटाच्या राजकारणाची दिशा ठरली असल्याचे सूचकपणे सांगत होते.