Satara Politics: रामराजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच - खासदार नितीन पाटील; पालकमंत्रिपदावर बोलणे टाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 18:07 IST2025-01-31T18:05:54+5:302025-01-31T18:07:29+5:30

जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळेल

Ramraje Naik Nimbalkar in NCP says MP Nitin Patil | Satara Politics: रामराजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच - खासदार नितीन पाटील; पालकमंत्रिपदावर बोलणे टाळले

Satara Politics: रामराजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच - खासदार नितीन पाटील; पालकमंत्रिपदावर बोलणे टाळले

सातारा : सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणीचा शुभारंभ झाला असून, पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यात येईल. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीतही राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल, असा विश्वास खासदार नितीन पाटील यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर रामराजेंच्या प्रश्नावर त्यांनी ते राष्ट्रवादीतच आहेत, असे उत्तरही दिले.

येथील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खासदार पाटील बोलत होते. यावेळी आमदार सचिन पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, सरचिटणीस निवास शिंदे, राजेंद्र लावंघरे आदी उपस्थित होते.

खासदार नितीन पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यात ताकद वाढविण्यात येणार आहे. यासाठी शिर्डी येथील पक्ष मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना केल्यानुसार जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. अजूनही काही निवडी राहिल्या आहेत. त्या पुढील काही दिवसांतच पूर्ण करण्यात येतील. पक्ष सभासद नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला आहे. यासाठी तालुकास्तरावरही बैठका घेण्यात येतील. यातून विक्रमी सभासद नोंदणी करू.

पालकमंत्रिपदावर बोलणे टाळले

पत्रकारांच्या विविध प्रश्नांना खासदार पाटील यांनी उत्तरे दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार का ? या प्रश्नावर पाटील यांनी महायुतीतील तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते निवडणुकीबाबत निर्णय घेतील, तो निर्णय आम्हाला मान्य असेल. पण, जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. शंभूराज देसाई यांच्या पालकमंत्रिपदाला विरोध होत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी हा व्यक्तीगत विषय असल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले. तसेच पक्ष कार्यालयात पुढील काळात जनता दरबारही भरविणार असल्याचेही खासदार पाटील यांनी स्पष्ट केले.

रामराजे पक्षाच्या बैठकीला

या पत्रकार परिषदेत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर खासदार पाटील यांनी रामराजे हे पक्षाच्या आमदारांच्या बैठकीला उपस्थित होते. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादीतच आहेत, असे सांगितले.

जिल्हा कार्याध्यक्षपदी संजय देसाई; युवा जिल्हाध्यक्षपदी पृथ्वीराज गोडसे

राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या नव्या निवडीत जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण समिती सभापती संजय देसाई यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी, तर वडूज येथील पृथ्वीराज गोडसे यांची युवकच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माण तालुकाध्यक्षपदी युवराज (बाबू) सूर्यवंशी, फलटण तालुकाध्यक्षपदी शिवरुपराजे खर्डेकर आणि फलटण तालुका महिला अध्यक्षपदी प्रतीभा शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Ramraje Naik Nimbalkar in NCP says MP Nitin Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.