कोयना वगळता इतर धरणक्षेत्रात पावसाची विश्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 13:29 IST2018-07-31T13:22:03+5:302018-07-31T13:29:02+5:30
सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात सतत तीन आठवड्यांहून अधिक काळ कोसळलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. सध्या कोयना धरण परिसर वगळता इतर धरणक्षेत्रात पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. कोयना धरणात ८५.९७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

कोयना वगळता इतर धरणक्षेत्रात पावसाची विश्रांती
सातारा : जिल्ह्यातील पश्चिम भागात सतत तीन आठवड्यांहून अधिक काळ कोसळलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. सध्या कोयना धरण परिसर वगळता इतर धरणक्षेत्रात पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. कोयना धरणात ८५.९७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात सलग २५ दिवसांहून अधिक काळ पाऊस पडत होता. यामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत. तर कोयना, कण्हेर, तारळी, उरमोडी, धोम, बलकवडी आदी धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करण्यात आला.
सध्या पाऊस थांबला असल्याने कोयना धरणातील पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरवाजातून पाणी सोडणे यापूर्वीच बंद करण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे फक्त ९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणात ५८९९ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. बलकवडी धरणात २३६, कण्हेर ३८९, उरमोडी ६४५, तारळी धरणात ८२० क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. तर कण्हेरमधून ५००, बलकवडी ३१५, उरमोडी ४०० आणि तारळी धरणातून ८२० क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला.
धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये
धोम ०० (४८२)
कोयना ०९ (३४६१)
बलकवडी ०० (१८१२)
कण्हेर ०० (७७५)
उरमोडी ०० (८७६)
तारळी ०० (१६००)