Raincoat Blossom Buildings Protecting from the heavy rains in Mahabaleshwar | इमारतींना रेनकोट गवताचे । महाबळेश्वरमधील अती पावसापासून रक्षण
इमारतींना झड्या : महाबळेश्वरमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसापासून इमारतींचे संरक्षण व्हावे, यासाठी जंगलातून आणलेल्या गवतांपासून झड्या लावल्या जातात. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

ठळक मुद्दे झड्या लावण्यास प्रारंभ

अजित जाधव ।

महाबळेश्वर : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जात असलेल्या महाबळेश्वरमध्ये दररोज सरासरी शंभर ते दीडशे मिलीमीटर पाऊस पडतो. एवढ्या पावसात माणसं बाहेर पडतच नाही. रेनकोटशिवाय काहीच होत नाही. मग महाबळेश्वरमधील शासकीय इमारती, घरं तरी कसं सुटतील. मुसळधार पावसापासून इमारतींना वाचविण्यासाठी गवतांपासून झड्या लावल्या जातात. हे त्यांचे रेनकोट. झड्या लावण्याच्या कामांनी सध्या वेग घेतला आहे.

पावसाची संततधार, दाट धुके व पावसाळी गारठा हे पावसाळी हंगामाचे खास वैशिष्ठ आहे. या वातावरणापासून इमारतीचे संरक्षण व्हावे, यासाठी प्रत्येक महाबळेश्वरवासीयांना काहीना काही तरी काळजी घ्यावीच लागते.सध्या त्याच गडबडीत महाबळेश्वरचे नागरिक आहेत. काही इमारतींना पारंपरिक गवताच्या झड्या म्हणजेच झडपा लावल्या जातात. काही इमारतींना विविध रंगाचे प्लास्टिक कागद लावून त्या संरक्षित केले. काहींना पत्राच्या झडपा लावल्याचे दिसत आहे.

पावसाळी वातावरणापासून इमारतीचे संरक्षण व्हावे, याासाठी गवताच्या झड्या वापरण्याची येथील फार जुनी व खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक उपाययोजना आहे. येथील बहुतेक ठिकाणी झड्याच वापरात यायची. या झड्या विशिष्ट पद्धतीने बनविल्या जातात. या बनविताना कारवीच्या काठ्या किंवा बाबू यांचे दोन तट्टे व त्यामध्ये दोन प्रकारचे गवत वापरले जाते. झडीच्या वरचे आवरण लांब-लांब कोळंब जातीच्या नळीसारख्या गवतांचे बनविलेले असते. इमारतीच्या भिंतीवर पडलेले पाणी जमिनीपर्यंत वाहून नेण्याचे काम हे आवरण करते. यामुळे पावसाळी थंडीपासून भिंतींचे रक्षण केले जाते.

गवताच्या पारंपरिक झड्यामुळे पावसाळ्यात धो-धो पाऊस पडूनही इमारतींच्या भिंतीपर्यंत पाणी व थंडही पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे भिंती सुकलेल्या व उबदार राहतात. यामुळे त्याचे रक्षणही होत असे. तसेच या झड्यांसाठी लागणारे सर्व साधनसामुग्री याच परिसरातील जंगलातच उपलब्ध होत असल्याने त्याचा वापर करणेही कमी खर्चिक आहे. पाण्याने कुजलेले गवत गुरांच्या गोट्यात गुरांना बसण्यासाठी वापरता येते. नंतर ते शेतात खत म्हणून वापरले जाते. तसेच झड्याच्या निकामी झालेल्या काठ्या पावसानंतर जळण म्हणून नागरिक वापरतात.

जून महिनाअखेर ठरणार अग्निपरीक्षा
इमारतींना लावल्या जाणाºया झड्या खºया अर्थाने पर्यावरणपूरक आहे. झड्या बनविण्यासाठी खूप मेहनत आहे. गवत, काठ्या जंगलातून आणण्यासाठी वनखात्याची परवानगी घ्यावी लागते. पूर्वीपेक्षा अलीकडे दिवसेंदिवस या गोष्टी किचकट व खर्चिक होऊ लागल्या आहेत. नव्या पिढीची बदलती मानसिकता, त्याच्यात कष्ट करण्याची पूर्वीच्या लोकांइतकी क्षमताही कमी होत असल्याचे दिसून येत आहे. 

 

Web Title: Raincoat Blossom Buildings Protecting from the heavy rains in Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.