Satara: कोयना क्षेत्रात पाऊस; धरणात पाण्याची आवक सुरु, सध्या किती आहे पाणीसाठा.. जाणून घ्या

By नितीन काळेल | Updated: June 2, 2025 19:32 IST2025-06-02T19:32:00+5:302025-06-02T19:32:29+5:30

नवजा २६, महाबळेश्वरला २४ मिलिमीटरची नोंद 

Rain in Koyna area Water inflow into dam begins | Satara: कोयना क्षेत्रात पाऊस; धरणात पाण्याची आवक सुरु, सध्या किती आहे पाणीसाठा.. जाणून घ्या

Satara: कोयना क्षेत्रात पाऊस; धरणात पाण्याची आवक सुरु, सध्या किती आहे पाणीसाठा.. जाणून घ्या

नितीन काळेल 

सातारा : जिल्ह्यात मे महिन्यात वळवाचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, तर जून महिना सुरू झाल्यापासून पश्चिम भागातील कोयना क्षेत्रात पाऊस सुरू झाला आहे. २४ तासात नवजा येथे २६, तर महाबळेश्वरला २४ मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे काेयना धरणात यंदा लवकरच पाणी आवक सुरू झाली आहे. धरणात सध्या २२.७३ टीएमसी पाणीसाठा आहे.

जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या - दुसऱ्या आठवड्यात दाखल होतो. त्यानंतरच पश्चिम भागात पावसाला सुरुवात होते. त्यानंतर कोयना धरणातही पाणी आवक होते. पण, यावर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात जिल्ह्यातच वळवाचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे.

पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण तालुक्यात तर धो-धो पाऊस कोसळला. यामुळे उन्हाळ्यातच तलाव भरले होते. तसेच ओढे भरून वाहू लागले आहेत, तर पश्चिम भागातही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जंगलातूनही पाणी वाहू लागले आहे. अशातच जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाची उघडीप असली तरी पश्चिमेकडील कास, बामणोली, कोयना, नवजा, महाबळेश्वर भागात पाऊस पडत आहे.

सोमवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजा येथे २६ आणि महाबळेश्वरला २४ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. १ जूनपर्यंत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला एकूण ३२ मिलिमीटर झाला आहे. कोयना धरणात एकूण २२.७३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हा साठा २१.६० टक्के इतका आहे.

१,३३६ क्यूसेक आवक सुरू

कोयना धरण परिसरात साधारणपणे १० जूननंतर पावसाला सुरुवात होते. जून महिन्याच्या उत्तरार्धापासून पाऊस जोर धरतो. त्यानंतरच धरणात पाण्याची सावकाशपणे आवक सुरू होते. पण, यंदा उन्हाळ्यातच कोयना क्षेत्रात दमदार पाऊस झाला. त्यानंतर मान्सूनचा पाऊसही वेळेपूर्वी सुरू झाला. मागील दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. यामुळे धरणात आवक सुरू झाली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास १ हजार ३३६ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. यंदा धरणात पाणी आवक लवकर सुरू झाली आहे.

Web Title: Rain in Koyna area Water inflow into dam begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.