कृष्णा कारखान्याच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST2021-06-17T04:26:13+5:302021-06-17T04:26:13+5:30

कऱ्हाड यशवंतराव मोहिते यांनी समाजहिताचे अनेक निर्णय घेतले. कृष्णा कारखान्याची स्थापना हा त्या निर्णयातील दूरदृष्टीचा निर्णय होता. त्याबरोबर त्यांनी ...

Put an end to the privatization of Krishna factory | कृष्णा कारखान्याच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडा

कृष्णा कारखान्याच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडा

कऱ्हाड

यशवंतराव मोहिते यांनी समाजहिताचे अनेक निर्णय घेतले. कृष्णा कारखान्याची स्थापना हा त्या निर्णयातील दूरदृष्टीचा निर्णय होता. त्याबरोबर त्यांनी कृषी पूरक व शिक्षण संस्थांना मंजुरी दिली. परंतु दुर्दैवाने काही स्वार्थी मंडळींनी त्यांच्या विचार व तत्त्वांना सुरुंग लावून त्या संस्था खासगी केल्या. हीच मंडळी कृष्णा कारखान्याकडे वक्रदृष्टी ठेवून पाहत आहेत. ते सत्तेवर आल्यास हाही कारखाना खासगी होईल. यामुळे पुढील पिढीचे अतोनात नुकसान होईल. याची काळजी करण्याची वेळ आली आहे. सभासदांनी सावध राहून कृष्णा कारखाना खासगीकरणाचा डाव हाणून पाडावा, असे प्रतिपादन यशवंतराव मोहिते रयत पॅनेलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते यांनी केले.

वनवासमाची व हजारमाची (ता. कराड) येथील प्रचार दौऱ्यात डाॅ. मोहिते बोलत होते. सुहास जगताप, रघुनाथ डुबल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. मोहिते म्हणाले, सत्ताधारी मंडळी सभासद विकासाच्या खोट्या वल्गना करत आहेत. माझ्या अध्यक्षपदाच्या काळात सात नवीन प्रकल्प उभे राहिले. त्यातून सभासदांच्या विकासाला चालना मिळाली. कारखान्याच्या कार्यस्थळावर आणखी नवे प्रकल्प उभारण्याचे नियोजन आखले होते. सुमारे ८० कोटी रुपयांची शिल्लक कारखान्याकडे होती.

मात्र, आमच्या सभासद हिताच्या कारभाराला कुटील डाव रचून दृष्ट लावली गेली. त्यानंतर सत्तेत आलेल्या संचालक मंडळाचा कारभार सर्वांना माहीत आहे. परिणामी कारखाना तोट्यात आला. गेल्या सहा वर्षांतील कारभार त्यापेक्षा वेगळा नाही. सभासदांनी आपले संसार सुखरूप राखण्यासाठी रयत पॅनेलच्या पाठीशी रहावे. आम्ही सभासदांचा सर्वांगीण विकास करू. दरम्यान, या वेळी डॉ. मोहिते यांनी सभासदांच्या प्रत्यक्ष भेटी घेत रयत पॅनेलचा जाहीरनामा दिला.

-----------------

फोटो ओळ

हजारमाची ता. कराड येथे प्रचार दौऱ्यात सभासदांना जाहीरनामा देताना डाॅ इंद्रजित मोहिते.

Web Title: Put an end to the privatization of Krishna factory