Satara: दरीत ढकलून दोघांचा खून, तिघांजणांच्या मुसक्या आवळल्या; एकीव धबधब्यावरील प्रकार
By नितीन काळेल | Updated: July 21, 2023 19:10 IST2023-07-21T19:09:28+5:302023-07-21T19:10:56+5:30
७२ तासांत गुन्हा उघडकीस; संशयित सातारा शहरातील

Satara: दरीत ढकलून दोघांचा खून, तिघांजणांच्या मुसक्या आवळल्या; एकीव धबधब्यावरील प्रकार
सातारा : जावळी तालुक्यातील एकीव धबधब्याजवळ किरकोळ भांडणातून दोघांना मारहाण करुन दरीत ढकलून देत खून केल्याप्रकरणी तिघाजणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ७२ तासांत गुन्हा उघडकीस आणला आहे. तर याप्रकरणी ताब्यात घेतलेले तिघेहीजण सातारा शहरातील रहिवाशी आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १६ जुलै रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास जावळी तालुक्यातील एकीव धबधब्याजवळ अनोळखी दोघांनी इतर दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन दरीत ढकलून दिले होते. यामध्ये अक्षय शामराव अंबवले ( वय २८, रा. बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) आणि गणेश अंकुश फडतरे (वय ३४, रा. करंजे पठे, सातारा) या दोघांचाही मृत्यू झाला होता. याप्रकरणी मेढा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला होता.
या घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिस अधीक्षक समीर शेख आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना केली होती. त्यानुसार देवकर यांनी पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले. हे पथक माहिती घेत होते. तपास सुरू असतानाच पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. एकीव येथील गुन्हा हा चाैघांनी मिळून केल्याचे समजले.
त्याप्रमाणे त्यांनी उपनिरीक्षक पाटील यांना संबंधितांना ताब्यात घेण्याची सूचना केली. या पथकाने तिघांना ताब्यात घेतले. आसिफ माजीद शेख (वय २२), निखील राजेंद्र कोळकेर (वय २३) आणि साहिल मेहबूब शेख (वय १८, सर्व रा. भीमाबाई आंबेडकरनगर, सदर बझार सातारा) अशी त्यांची नावे आहेत. संशियततांकडे विचारपूस केल्यावर त्यांनी किरकोळ भांडणाच्या कारणातून मारहाण करुन दोघांना दरीत ढकलून दिल्याचे सांगितले. सध्या तिघांही सशंयितांना मेढा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.