पर्यटकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; साताऱ्याच्या प्रस्तावित रिंगरोडची तयारी सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 15:11 IST2026-03-23T15:11:18+5:302026-03-23T15:11:42+5:30

भूसंपादनासाठी लागणार २० कोटी रुपये

Preparations for Satara proposed ring road begin | पर्यटकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; साताऱ्याच्या प्रस्तावित रिंगरोडची तयारी सुरू 

पर्यटकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; साताऱ्याच्या प्रस्तावित रिंगरोडची तयारी सुरू 

सातारा : ‘सातारा शहरातून जाणाऱ्या प्रस्तावित रिंगरोडचे रेखांकन तयार असून, प्रशासकीय पातळीवर या कामाची तयारी सुरू झाली आहे. रिंगरोडसाठी आवश्यक जागेच्या भूसंपादनाची जबाबदारी पालिकेची असून, यासाठी सुमारे २० कोटी रुपये लागणार आहे. या रस्त्यामुळे कास, ठोसेघरला जाणाऱ्या पर्यटकांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होईल,’ अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात रविवारी (दि. २२) दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘कास रस्त्याला जाण्यासाठीच्या रिंगरोडचे रेखांकन तयार आहे. शाहूनगरमार्गे अजिंक्यतारा, अदालतवाडाची पिछाडी, बोगदा येथून पॉवर हाऊस व महादरे, पेढ्याचा भैरोबा मार्गे मेढ्याच्या जुन्या रस्त्याला जोडला जाईल. यामध्ये भूसंपादनाची जबाबदारी पालिकेची असून, त्यासाठी अंदाजे २० कोटी रुपये लागणार आहेत. या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाईल. 

सुरूर ते पोलादपूर या रखडलेल्या रस्त्याबाबत ते म्हणाले, ‘संबंधित ठेकेदाराकडून या कामात निश्चितच दिरंगाई करण्यात आली. या दिरंगाईचा नागरिक, व्यावसायिकांना फटका बसला. मंत्रालयातील बैठकीत संबंधित ठेकेदाराला काम वेळेत मार्गी न लावल्यास कारवाई करण्याच्या इशारा देण्यात आल्याची माहिती शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली. दरम्यान, साताऱ्यातील किल्ले अजिंक्यतारा, महाराणी ताराराणी यांची समाधी, मुनावळे ते वासोटा रोपवे, दरे येथे निसर्गोपचार केंद्र, कटगुण येथे महात्मा फुले यांचे तर नायगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

शेतकऱ्यांना आधार देणारा अर्थसंकल्प

राज्याचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात आले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून राज्यात १६ हजार मेट्रिक वॅट ऊर्जाक्षमता निर्माण केली जाणार आहे. यातून कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जाईल.

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील पूर निवारणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने २ हजार २४० कोटींचा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्याचबरोबच कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी भीमा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात वळविण्यात येईल, अशी माहितीही यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

Web Title : पर्यटकों को जाम से मिलेगी मुक्ति; सतारा रिंग रोड की तैयारी शुरू

Web Summary : सतारा में प्रस्तावित रिंग रोड कास और ठोसेघर जाने वाले पर्यटकों के लिए यातायात की भीड़ कम करेगा। परियोजना में भूमि अधिग्रहण शामिल है जिसका प्रबंधन नगरपालिका द्वारा किया जाता है, और निर्माण लोक निर्माण विभाग द्वारा किया जाता है। सरकार ने किसानों और बाढ़ प्रबंधन परियोजनाओं के लिए भी पहल की घोषणा की।

Web Title : Satara Ring Road to Ease Tourist Traffic; Preparation Begins

Web Summary : Satara's proposed ring road aims to alleviate traffic congestion for tourists heading to Kaas and Thoseghar. The project includes land acquisition managed by the municipality, with construction overseen by the Public Works Department. The government also announced initiatives for farmers and flood management projects.