'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 07:23 IST2025-10-26T07:23:30+5:302025-10-26T07:23:42+5:30
पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने हा शनिवारी रात्री उशिरा स्वतःहून फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाला

'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
फलटण (जि. सातारा): महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर याला फलटण पोलिसांनी शनिवारी पहाटे ३ वाजता पुणे येथील फार्म हाऊसवरून अटक केली. तर दुसरा आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने हा शनिवारी रात्री उशिरा स्वतःहून फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याच्या अटकेची कारवाई सुरू केली. नागरिकांनी ठाण्याकडे धाव घेतली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तातडीने बंदोबस्त तैनात केला. प्रशांत बनकर याला फलटण येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात शनिवारी दुपारी २ वाजता हजर केले असता, पोलिसांनी सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. यावर न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
न्यायालयाने आरोपीच्या चौकशीसाठी चार दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली असून, शहर पोलिस ठाणे येथे हलविण्यात आले आहे. पोलिस ठाण्याला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
राज्य राखीव दलाची अतिरिक्त टीम याठिकाणी कडेकोट बंदोबस्तासाठी हजर होती. जिल्हा अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कुडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे चौकशीसाठी उपस्थित होते.
कुटुंबीयांकडून 'एसआयटी' चौकशीची मागणी
कुटुंबीयांनी या प्रकरणाची 'एसआयटी' मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. आमदार प्रकाश सोळंके यांनी या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना त्वरित पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले.
कुटुंबीय म्हणाले त्रास देणाऱ्यांची चौकशी करा
चुलते : आम्हाला न विचारताच शवविच्छेदन खोलीत मृतदेह नेण्यात आला. त्यामुळे आम्हाला काहीतरी संशय आहे. शासनाने न्याय द्यावा.
चुलतभाऊ (डॉक्टर) : बहिणीला त्रास देणाऱ्या शैल्यचिकित्सक धुमाळ यांचीही चौकशी व्हावी.
बहीण : तिच्याशी फोनवर बोलणे झाले होते. तिने तक्रार केल्याने वरिष्ठ जास्त त्रास देऊ लागले होते.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच पत्करली शरणागती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी फलटण येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने येत आहेत. दुसरीकडे बदने फरार होता. त्यामुळे पोलिसांवर प्रचंड दबाव होता. आता बदने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाल्याने पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
'ती'ला त्रास देणाऱ्या वरिष्ठांवर कारवाई करण्याची मागणी
"आमची मुलगी आत्महत्या करू शकत नाही, तिला मानसिक त्रास देऊन आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आले आहे," असा गंभीर आरोप आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी केला. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी तिला सतत त्रास देत होते. तिने वरिष्ठांना दिलेले चार पानांचे खुलासा पत्र महत्त्वाचे असून, त्याआधारे तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सातारा येथे शुक्रवारी दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह वडवणी तालुक्यातील त्यांच्या मूळगावी आणला आणि शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी तिच्या कुटुंबीयांनी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.