Satara: प्रकरण आत्महत्येचे, लढाई निंबाळकरांची; राजकीय आखाड्याने चौकशी यंत्रणेवर ताण
By हणमंत पाटील | Updated: October 31, 2025 14:28 IST2025-10-31T14:27:51+5:302025-10-31T14:28:27+5:30
दिशा भरकटल्याने फलटणची बदनामी

Satara: प्रकरण आत्महत्येचे, लढाई निंबाळकरांची; राजकीय आखाड्याने चौकशी यंत्रणेवर ताण
हणमंत पाटील
सातारा : फलटण येथील पीडिता डॉक्टरने आत्महत्या केली. या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी करण्याच्या मागणीऐवजी फलटण शहर हा राजकीय आखाडा बनला आहे. स्थानिक पारंपरिक विरोधक असलेले विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात राजकीय लढाई सुरू झाली आहे.
फलटणमधील हे दोन्ही नेते पीडिता आत्महत्या प्रकरणावरून प्रत्यक्ष कुठेही पुढे येताना दिसत नाहीत. पण ते शांत राहून स्थानिक, राज्यस्तरीय व केंद्रीय नेत्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत असल्याचे फलटणकरांचे म्हणणे आहे. त्यामुळे पीडिता आत्महत्येच्या चौकशी यंत्रणेवर ताण येत असून, फलटणकरांनी नाहक बदनामी होऊ लागली आहे.
गेल्या आठवड्यापासून फलटण उपजिल्हा रुग्णालयातील पीडिता डॉक्टर आत्महत्येचे प्रकरण दरदिवशी वेगळे वळण घेत आहे. याप्रकरणावरून राजकारण रंगू लागल्याने गंभीर प्रकरणातील चौकशीची दिशा भरकटण्याची भीती पीडितेचे नातेवाईक व फलटणकरांना वाटू लागली आहे.
स्थानिक राजकारण तापतेय कोण...?
एका बाजूला पोलिस यंत्रणेवर चौकशीचा ताण असताना फलटणमधील स्थानिक राजकारण दिवसेंदिवस तापत चालले आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे दोन पीए (स्वीय सहायक) वारंवार पीडित महिलेला फोन करीत असल्याचा आरोप उद्धवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. त्यानंतर जयश्री आगवणे यांनीही पुण्यात पत्रकार परिषद घेऊन रणजितसिंह यांना लक्ष केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉटेलमालक दिलीपसिंह भोसले यांनी नाव न घेता, तर ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील यांनी थेट नाव घेत रामराजे यांना लक्ष केले. आता दोन्ही निंबाळकर यांच्या लढाईत आणखी सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते उतरण्याची शक्यता आहे.
वाचा : ज्यांना अब्रू नाही त्यांची बेअब्रू कशी?, हा संशोधनाचा विषय - रामराजे नाईक-निंबाळकर
जिल्हाधिकाऱ्यांचे 'त्या' मेळाव्यात प्रास्ताविक...
पीडिता आत्महत्येच्या तिसऱ्या दिवशी फलटणमधील विविध विकासकामांच्या भूमिपूजनानंतर भाजप नेत्यांनी कृतज्ञता मेळावा घेतला. कृतज्ञता मेळावा हा राजकीय कार्यक्रम असताना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रास्ताविक केले. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेळाव्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना ‘क्लीन चिट’ दिली. त्यानंतर विरोधकांनी आत्महत्याच्या घटनेवरून सत्ताधारी पक्ष व नेत्यांना लक्ष करण्यास सुरुवात केली.
प्रशासकीय यंत्रणेत राजकीय हस्तक्षेप...
- गेल्या काही वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने प्रशासकीय यंत्रणेत आजी-माजी आमदार, खासदार व मंत्रिमहोदयांचा हस्तक्षेप वाढला आहे.
- ‘खादी’ आणि ‘खाकी’ एक झाल्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. याच यंत्रणेमुळे शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे पीडितेने आक्षेप नोंदविले आहेत.
- याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांची नियुक्ती केली आहे. संशयित आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने व इंजिनिअर प्रशांत बनकर यांना अटक केली आहे. त्यांची चौकशी, पोलिस कोठडी व न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
- दुसऱ्या बाजूला या प्रकरणावरून फलटणमध्ये राजकीय आखाडा तयार झाल्याने त्याचा ताण पीडितेच्या आत्महत्येच्या चौकशीच्या प्रकरणावर येऊ लागला आहे.
 
फलटणकरांना पडलेले प्रश्न...
- स्थानिक नेत्यांच्या विरोधातील कागदपत्रे मुंबईतील नेत्याकडे कशी?
- माजी खासदार दोषी नव्हते, तर मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट का दिली?
- आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआय व एसआयटीकडे का नाही?
- प्रकरण न्यायप्रविष्ट असताना नेत्यांची राजकीय जाण व भान कुठेय?