‘खाकी’च्या अंगात बळ; पण छातीत कळ!; हृदयविकारासह अन्य आजारांनी पोलिसांना ग्रासले

By संजय पाटील | Updated: April 4, 2025 15:39 IST2025-04-04T15:38:50+5:302025-04-04T15:39:08+5:30

शारीरिक, मानसिक स्वास्थ्य गरजेचे : ताणतणावाचा परिणाम

Police suffer from heart disease and other illnesses due to work stress and inadequate facilities | ‘खाकी’च्या अंगात बळ; पण छातीत कळ!; हृदयविकारासह अन्य आजारांनी पोलिसांना ग्रासले

‘खाकी’च्या अंगात बळ; पण छातीत कळ!; हृदयविकारासह अन्य आजारांनी पोलिसांना ग्रासले

संजय पाटील

कऱ्हाड : पोलिस सामाजिक स्वास्थ्य राखतात; पण ‘ड्यूटी’ बजावताना अनेक वेळा त्यांचेच शारीरिक, मानसिक स्वास्थ्य बिघडते. व्याधी हैराण करतात. एवढेच नव्हे तर अगदी हृदयविकाराचाही त्यांना सामना करावा लागतो. या परिस्थितीमागे वेगवेगळी कारणे असली तरी कामाचा ताण, अपुऱ्या सोयीसुविधा आणि व्याधींकडे होणारे दुर्लक्ष अनेक वेळा पोलिसांच्या जीवावर बेतते.

कऱ्हाडात सत्त्वशीला पवार या पस्तीस वर्षीय महिला पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने खाकीसह समाजमन हळहळले. पोलिस दलात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. सातारा मुख्यालयातील विकास पवार, कऱ्हाड उपविभागातील राजेंद्र राऊत, कोरेगाव पोलिस ठाण्यातील लक्ष्मण हजारे यांचाही यापूर्वी हृदयविकारानेच मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, एवढे होऊनही पोलिसांच्या शारीरिक, मानसिक स्वास्थ्याकडे म्हणावे तेवढ्या गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसते.

मुळातच पोलिसांना चोवीस तास सतर्क राहावे लागते. ऊन, वारा, पाऊस, थंडी याचा कसलाही विचार न करता कर्तव्य बजावावे लागते. आजाराचे कारण सांगून त्यांना जबाबदारी झटकता येत नाही. आणि ‘ड्यूटी’वर असतानाही त्यांना आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. एवढेच नव्हे तर ‘ऑफ ड्यूटी’ असतानाही अनेक वेळा कामाच्या ओझ्याखालीच ते दबलेले असतात. या सर्वाचा त्यांच्या शरीरावर दूरगामी परिणाम होताना दिसतो.

वय वाढतं, सेवा वाढते अन् आजारही..

पोलिस दलात नव्याने भरती झालेले अधिकारी, कर्मचारी त्यामानाने निरोगी असतात. मात्र, काही वर्षे सेवा केली की त्यांनाही वेगवेगळ्या शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. जसजसं वय आणि सेवा वाढत जाते, तसतसे ते आजारांना बळी पडतात.

झीज.. शारीरिक अन् मानसिकही

पोलिसांचे कष्ट मर्यादित नसतात. त्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही काम करावे लागते. गुन्ह्यांचा तपास तसेच कार्यालयीन कामात त्यांना अगदी टोकाचा विचार करावा लागतो. तर मोर्चा, आंदोलने, गर्दी बंदोबस्तावेळी त्यांच्या बळाचा वापर होतो. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही त्यांची दररोज झीज होते.

..यामुळे आजाराला निमंत्रण

  • कामाचा ताणतणाव
  • वारंवार होणारे जागरण
  • अपुरी आणि संकुचित झोप
  • अवेळी मिळणारे जेवण
  • व्यायामाचा अभाव
  • कुटुंबाकडे होणारे दुर्लक्ष
  • किरकोळ दुखण्यांकडे दुर्लक्ष


व्याधींचे सरासरी प्रमाण

  • ९ टक्के : हृदयविकार
  • १३ टक्के : उच्च रक्तदाब
  • १६ टक्के : वाढता मधुमेह
  • २२ टक्के : असह्य अंगदुखी
  • २६ टक्के : त्रासदायक पित्त
  • १४ टक्के : इतर आजार

धकाधकी, ताणतणाव यामुळे पोलिसांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. शारीरिक त्रासाकडे होणारे दुर्लक्षही अनेक वेळा मोठ्या आजाराला निमंत्रण देणारे ठरते. पोलिसांची सुदृढता आणि सुसज्जता याबाबत म्हणावे तेवढे काम होत नाही. आरोग्य शिबिरांबरोबरच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरेसा वेळ आणि आराम मिळण्यासाठी नियोजन होणे आवश्यक आहे. - संभाजी पाटील, निवृत्त पोलिस उपअधीक्षक, सातारा

Web Title: Police suffer from heart disease and other illnesses due to work stress and inadequate facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.