Phaltan Doctor Death: पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने सेवेतून बडतर्फ, पोलिस महानिरीक्षकांचे आदेश
By दत्ता यादव | Updated: November 5, 2025 15:41 IST2025-11-05T15:40:51+5:302025-11-05T15:41:30+5:30
सातारा: फलटण येथील डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आल्याचा आदेश ...

Phaltan Doctor Death: पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने सेवेतून बडतर्फ, पोलिस महानिरीक्षकांचे आदेश
सातारा: फलटण येथील डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आल्याचा आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बुधवारी काढला.
फलटण येथे २३ ऑक्टोबर रोजी एका डॉक्टर युवतीने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. फौजदार गोपाळ बदने याने चार वेळा अत्याचार केला तर इंजिनीयर प्रशांत बनकर याने मानसिक छळ केला, असे पीडित युवती डॉक्टरने तळहातावर लिहिल्याचे समोर आले होते. या प्रकारानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. इंजिनीयर बनकरला पुण्यातून पोलिसांनी अटक केली तर फौजदार बदने हा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला होता. या प्रकरणात बदनेचे नाव समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी बदनेला निलंबित केले होते.
बदनेमुळे पोलीस दलाची बदनामी झाली. असा ठपका ठेवून त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, असा प्रस्ताव सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला सेवेतून बडतर्फ केल्याचा आदेश बुधवारी काढण्यात आला.
आदेशात काय..
निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने पोलीस दलाचे पूर्ण ज्ञान असताना बेफिकिरीने नैतिक अंधपतन व दूरवर्तन, विकृतपणे पोलीस उपनिरीक्षक पदाचा व अधिकारांचा दुरुपयोग केला. समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तणूक केली. पोलीस उप निरीक्षक पदास अशोभनीय कृत्य करून कर्तव्य पालनात व दैनंदिन जीवनात संशयास्पद वर्तन केले आहे. केलेले कृत्य हे अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे. त्यामुळे गोपाळ बदने यास शासकीय सेवेत यापुढे कर्तव्यर्थ ठेवणे सार्वजनिक व लोकहिताचे दृष्टिकोनातून उचित होणार नाही. म्हणून निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला भारतीय राज्यघटना १९५० मधील अनुच्छेद ३११-२ ब अन्वे शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे.