सातारा जिल्ह्यात दुष्काळी भागात निर्यातक्षम फळबागा होणार, एआय तंत्रज्ञान वापरणार; कृषी विभागाची तयारी
By नितीन काळेल | Updated: February 13, 2025 16:29 IST2025-02-13T16:28:47+5:302025-02-13T16:29:13+5:30
सातारा जिल्हा महाराष्ट्राचं फ्रूट बास्केट म्हणून येतोय पुढं

सातारा जिल्ह्यात दुष्काळी भागात निर्यातक्षम फळबागा होणार, एआय तंत्रज्ञान वापरणार; कृषी विभागाची तयारी
नितीन काळेल
सातारा : सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी माण, खटाव तालुक्यात उरमोडी आणि जिहे कटापूर योजनेचे पाणी पोहोचत आहे. अशा ठिकाणी जवळपास ७ हजार हेक्टरवर निर्यातक्षम फळबागांचे नियोजन आहे. यासाठी राज्य कृषी विभागाने पूर्ण तयारी केली आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
सातारा जिल्हा महाराष्ट्राचं फ्रूट बास्केट म्हणून पुढे येत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४० प्रकारची विविध फळे घेण्यात येतात. अशी सर्व पार्श्वभूमी असल्याने जिल्ह्यात फळबागांचा विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी राज्य कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्या मार्गदर्शनातून माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात नवीन फळबाग लागवडीचा प्रकल्प होत आहे.
जिल्ह्याच्या पूर्व भागातील माण, खटाव तालुक्यात उरमोडी आणि जिहे कटापूर योजनेचे पाणी पोहोचत आहे. जवळपास ७० हजार हेक्टर क्षेत्र या योजनेतून ओलिताखाली येणार आहे. या लाभक्षेत्रातच निर्यातक्षम फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कृषी विभागाने पूर्ण तयारी केली आहे.
यासाठी शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, रोजगार हमी योजनेतून फळबाग, मागेल त्याला शेततळे आणि सुक्ष्म सिंचन योजनेचे एकत्रीकरण करून लाभ देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. तसेच काही वर्षातच दुष्काळी तालुक्यातील माळरानावर निर्यातक्षम फळबागा डोलताना दिसणार आहेत.
१२५ गावात राबविण्यात येणार
कृषी विभागाच्या माध्यमातून माण, खटाव आणि कोरेगाव या तीन तालुक्यातील सुमारे १२५ गावांत या फळबागा होणार आहेत. यासाठी एआय या तंत्रज्ञानाचाही काही प्रमाणात वापर करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी २०० प्रशिक्षणे प्रस्तावित
सातारा जिल्ह्यातून द्राक्षे आणि डाळिंबाची निर्यात होत आहे. त्याचबरोबर या योजनेत आंबा, आवळा, सीताफळ, पेरू, डाळिंब, द्राक्षे या मुख्य फळबागा योजनेतून घेण्यात येणार आहेत. याची फळेही उच्च दर्जाची मिळणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सुमारे २०० प्रशिक्षणे प्रस्तावित आहेत. याची लागवड पावसाळ्यात करण्याचे नियोजन आहे. भविष्यात या बागा सेंद्रिय प्रमाणाखालीही आणण्यात येणार आहेत.
फळबागांचे असे नियोजन..
- माण तालुका ३,५०० हेक्टर
- खटाव ३,००० हेक्टर
- कोरेगाव ५०० हेक्टर
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात उरमोडी आणि जिहे कटापूर योजनेचे पाणी जात आहे. याच्या लाभक्षेत्रात निर्यातक्षम फळबागा घेण्याचे नियोजन झाले आहे. जवळपास ७ हजार हेक्टरवर या बागा असणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. या फळबागांमधून शेतकऱ्यांचा आर्थिक स्रोत आणखी भक्कम होणार आहे. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी