फलटणच्या महिला डाॅक्टरचे आत्महत्या प्रकरण: तेजस्वी सातपुतेंच्या नेतृत्वात 'एसआयटी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 12:31 IST2025-11-02T12:29:41+5:302025-11-02T12:31:06+5:30
पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शनिवारी आदेश काढला

फलटणच्या महिला डाॅक्टरचे आत्महत्या प्रकरण: तेजस्वी सातपुतेंच्या नेतृत्वात 'एसआयटी'
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: फलटणच्या महिला डाॅक्टरच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी राज्य सरकारच्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) नेतृत्व आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते करणार आहेत. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शनिवारी आदेश काढला.
याप्रकरणी सध्या जो तपास सुरू आहे, त्यात मार्गदर्शन आणि देखरेख करणे याशिवाय स्वतंत्र एसआयटीमध्ये काही अधिकाऱ्यांचा समावेश करून तपासाला गती देणे अशी सातपुते यांच्या एसआयटीची कार्यकक्षा असून साताऱ्यात दाखल होत त्यांनी लगेचच सुत्रे स्वीकारली.
तेजस्वी सातपुते सध्या राज्य राखीव पोलिस दलाच्या समादेशक म्हणून पुणे येथे आहेत. सातारा जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.
महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत तातडीने व्हावा, त्यासाठी कारणीभूत असलेल्यांवर आरोप लवकरात लवकर निश्चित व्हावेत, असा आमचा प्रयत्न असेल.
-तेजस्वी सातपुते, एसआयटी प्रमुख