Pawan solwande murder in karad | कराडमध्ये तरुणाची 11 गोळ्या झाडून हत्या 
कराडमध्ये तरुणाची 11 गोळ्या झाडून हत्या 

ठळक मुद्देकराड शहरात मध्यरात्री पवन सोळवंडे (30) या तरुणाची 11 गोळया झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. घटनेमुळे कराड शहरात तणावाचे वातावरण असून ही हत्या टोळी वर्चस्वातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी कोल्हापूर, सांगली, सातारा येथे पथके रवाना केली आहेत.

सातारा - कराड शहरात मध्यरात्री पवन सोळवंडे (30) या तरुणाची 11 गोळया झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कराड शहरात तणावाचे वातावरण असून ही हत्या टोळी वर्चस्वातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन सोळवंडे हा कराड येथील बुधवार पेठेमध्ये राहत होता. रात्री पावणे एकच्या सुमारास पवन हा जेवण करून घराबाहेर आला. याचवेळी त्याच्या घरासमोर दबा धरून बसलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी अगदी जवळून त्याच्यावर गोळीबार केला. तब्बल अकरा गोळ्या पवनच्या छातीमध्ये आणि डोक्यामध्ये घुसल्या. त्यामुळे जागीच त्याचा मृत्यू झाला.  गोळीबाराच्या आवाजाने शेजारी असलेले काही लोक बाहेर आले. मात्र तोपर्यंत हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले होते.

पवन याच्यावरही खंडणी, जबरी चोरी, मारहाण अशा प्रकारचे कराड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दोन दिवसापूर्वीच पवनवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. ही हत्या टोळी वर्चस्वातून झाली असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. हत्ये प्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी कोल्हापूर, सांगली, सातारा येथे पथके रवाना केली आहेत. या हत्या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ करत आहेत.

 


Web Title: Pawan solwande murder in karad
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.