जेम्स लेनच्या पुस्तकातील शिवरायांवरील अवमानकारक लिखाणाबाबत २२ वर्षांनी ऑक्सफर्डने मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 06:18 IST2026-01-07T06:18:36+5:302026-01-07T06:18:36+5:30
Chhatrapati Shivaji Maharaj Book Controversy: अमेरिकी लेखक जेम्स लेनच्या या पुस्तकाविरोधात मोठे आंदोलन झाले होते.

जेम्स लेनच्या पुस्तकातील शिवरायांवरील अवमानकारक लिखाणाबाबत २२ वर्षांनी ऑक्सफर्डने मागितली माफी
Oxford University Press Apology:छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे आणि अवमानकारक लेखन असलेल्या ‘शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ (Shivaji Hindu King In Islamic India) या पुस्तकाबाबत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (Oxford University) प्रेसने माफी मागितली. २२ वर्षांच्या संघर्षानंतर या संस्थेने छत्रपतींचे वंशज खा. उदयनराजे भोसले यांची लेखी माफी मागितली आहे. अमेरिकी लेखक जेम्स लेनच्या या पुस्तकाविरोधात मोठे आंदोलन झाले होते.
ऑक्सफर्ड म्हणते, आम्हाला वाईट वाटते!
‘या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक ३१, ३४, ३३ आणि ९३ वरील काही विधाने पडताळणी न करता प्रसिद्ध केली आहेत. त्याबद्दल आम्हाला मनापासून वाईट वाटत आहे. लेखनामुळे जनभावना दुखावल्या गेल्या आहेत, त्याबद्दल आम्ही खासदार उदयनराजे भोसले यांची आणि जनतेची माफी मागतो,’ अशा शब्दांत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने दिलगिरी व्यक्त केली.
सातारकरांचा यशस्वी लढा
हा माफीनामा म्हणजे इतिहासाची मोडतोड करणाऱ्यांविरुद्ध सातारकरांनी दिलेल्या लढ्याचा मोठा विजय मानला जात आहे. या निर्णयाचे साताऱ्यातील शिवप्रेमींकडून स्वागत करण्यात आले.
जेम्स लेन लिखित पुस्तकात छत्रपती शिवराय व माँ साहेब जिजाऊ यांची प्रतिमा मलीन करण्याचा जो मजकूर होता. त्याविरोधात न्यायालयात गेलाे होताे. सुनावणी दरम्यान, संबंधितांनी माफी मागण्याची तयारी दर्शवली. प्रकाशन संस्थेने माफीनामा लिहून दिला आहे. उदयनराजे भोसले, खासदार