आमचा भाजपा प्रवेश सुरत, गुवाहाटीमार्गे झालेला नाही; सत्यजित पाटणकरांचा शंभुराज देसाईंना खोचक टोला

By प्रमोद सुकरे | Updated: June 11, 2025 19:45 IST2025-06-11T19:44:28+5:302025-06-11T19:45:06+5:30

भाजपचे विचार तळागाळात पोहोचवणे यालाच आमचे प्राधान्य राहणार आहे. पक्ष ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे कार्यरत राहणार असल्याचे सत्यजित पाटणकर यांनी सांगितले.

Our entry into BJP did not happen through Surat, Guwahati; Satyajit Patankar Target Shambhuraj Desai | आमचा भाजपा प्रवेश सुरत, गुवाहाटीमार्गे झालेला नाही; सत्यजित पाटणकरांचा शंभुराज देसाईंना खोचक टोला

आमचा भाजपा प्रवेश सुरत, गुवाहाटीमार्गे झालेला नाही; सत्यजित पाटणकरांचा शंभुराज देसाईंना खोचक टोला

प्रमोद सुकरे 

कराड - आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर सर्व गोष्टी घातलेल्या आहेत.आमचा भाजप प्रवेश सुरत, गुवाहाटी मार्गे झालेला नाही. उलट ज्या बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः येऊन ज्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला त्यांच्याशी त्यांनी प्रतारणा केली. त्यांच्या मुलाशी ठाम राहिले नाहीत. त्यामुळे आमच्या पक्षप्रवेशाला मोठे नेते नव्हते अशी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होणारी टीका चुकीची असल्याचे मत भाजपचे नेते, पाटण पंचायत समितीचे माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त केली.

पाटणकर म्हणाले, भाजप देशातीलच नव्हे तर जगामधला सर्वात मोठा पक्ष आहे. या मोठ्या पक्षाच्या माध्यमातूनच आपल्या विधानसभा मतदारसंघातील प्रश्न मार्गी लागू शकतात हा विश्वास वाटल्यानेच कोणतीही मागणी न करता,अटी शर्ती न ठेवता आम्ही भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

तुमच्या मतदारसंघात महायुतीचेच आमदार आणि मंत्री आहेत. त्यामुळे आगामी काळात आपण तालुक्यात एकत्रित काम करणार का? याबाबत विचारले असता भाजपचे विचार तळागाळात पोहोचवणे यालाच आमचे प्राधान्य राहणार आहे. पक्ष ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे कार्यरत राहणार असल्याचे सत्यजित पाटणकर यांनी सांगितले.

म्हणून 'हात' सोडला..
 
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्ती म्हणून तुमची ओळख होती. मात्र तुम्ही आता 'हात' सोडला. याबाबत हिंदुराव पाटील यांना माध्यमांनी छेडले. त्यावर गेल्या १५ वर्षापासून पाटण तालुका विकासापासून लांब राहत गेला. सध्या राजकारणा बदलत चालले आहे. हिंदुत्वाची लाट आली आहे. म्हणूनच आम्ही त्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचे हिंदुराव पाटील यांनी सांगितले.

सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बुधवारी ते कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी ते माध्यमांची बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते हिंदुराव पाटील, पाटणचे माजी सभापती राजाभाऊ शेलार, माजी उपसभापती रमेश मोरे, पाटण अर्बन बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब राजेमहाडिक, आनंदराव चव्हाण पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील, उद्योजक विकास पवार, संदीप जाधव,बापू सावंत, शशिकांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Our entry into BJP did not happen through Surat, Guwahati; Satyajit Patankar Target Shambhuraj Desai