सातारा: 'रयत' कारखाना निवडणुकीतून विरोधकांची माघार; बिनविरोधाची औपचारिकता बाकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 13:33 IST2022-07-11T13:31:47+5:302022-07-11T13:33:21+5:30
अपात्र ठरविलेल्या उमेदवारांनी साखर सहआयुक्त पुणे यांच्याकडे दाद मागितली. मात्र ही याचिका फेटाळण्यात आली

सातारा: 'रयत' कारखाना निवडणुकीतून विरोधकांची माघार; बिनविरोधाची औपचारिकता बाकी
प्रमोद सुकरे
कराड : शेवाळवाडी (ता. कराड) येथील रयत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या 24 जुलै रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी रयत व सहकार या दोन पॅनेलकडून अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र यातील सहकार पॅनेलने निवडणुकीतून माघार घेत असल्याचे आज, सोमवारी जाहीर केल्याने आता कारखाना निवडणूक बिनविरोधची औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे. कारखान्याचे हित लक्षात घेऊनच आम्ही या निवडणूकीतून माघार घेत असल्याचे सहकार पॅनलचे प्रमुख अॅड. आनंदराव पाटील यांनी सांगितले.
रयत सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष अॅड उदयसिंह पाटील व त्यांचे चुलत बंधू व कारखान्याचे माजी अध्यक्ष जयसिंगराव पाटील यांचे वारसदार अॅड. आनंदराव पाटील यांनी परस्परविरोधी पॅनेल उभे केले होते. मात्र अर्ज छाननीवेळी आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलचे काही अर्ज अवैध करण्यात आले. त्यामुळे काही ठिकाणी जागा बिनविरोध होणार अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावर त्या अपात्र ठरविलेल्या उमेदवारांनी साखर सहआयुक्त पुणे यांच्याकडे दाद मागितली. मात्र ही याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे आता या निवडणुकीत काय होणार ?याबाबतची उत्सुकता लागून राहिली होती.
दरम्यान आज, सोमवारी दुपारी सहकार पॅनलचे प्रमुख अॅड. आनंदराव पाटील व त्यांचे उमेदवारांनी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यावेळी त्यांनी आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. अॅड. पाटील म्हणाले, रयत सहकारी साखर कारखान्याची उभारणी माजी मंत्री विलासराव पाटील व ज्येष्ठ नेते जयसिंगराव पाटील या दोन बंधूंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केली. महाराष्ट्रात उभ्या राहिलेल्या कारखान्यापैकी अल्प खर्चामध्ये उभा राहिलेला रयत हा कारखाना आहे. पण त्यानंतरच्या काळात आलेला लोकरी मावा, गेटकेन ऊस, एफआरपी, आदिंमुळे कारखान्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे या दोन्ही बंधूनी अथणी शुगरला कारखाना चालवण्यास दिला. आज तो कारखाना कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर आहे.
खरंतर या निवडणुकीसाठी आमच्या पॅनेलने दाखल केलेले काही अर्ज बाद झाले. तरीही उर्वरित उमेदवार लढण्यासाठी तयार होते. मात्र ज्येष्ठ नेते जयसिंगराव पाटील यांनी शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार व कारखान्याची आर्थिक परिस्थिती पाहता कोणतीही अट न घालता अर्ज मागे घेण्याच्या सूचना आम्हाला केल्या आहेत. सद्यस्थितीत कारखाना चालवायला दिला असल्याने निवडणुकीचा आर्थिक भार कारखान्यावर नको. कारखान्याचे हित लक्षात घेऊनच आम्ही या निवडणूकीतून माघार घेत आहोत.
सहकार्याची भूमिका घेऊ
नव्या संचालक मंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांच्या उसाचे गाळप वेळेत करावे. मयत सभासदांच्या वारस नोंदी करून घ्याव्यात; कृष्णा नदीवरून करण्यात येणारी जलसिंचन योजना मार्गी लावावी; चांगला ऊस दर द्यावा; रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे; को जनरेशन; वीज प्रकल्प; डिस्टलरी उभी करावी अशी अपेक्षा अँड. आनंदराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली व यासाठी आपण सहकार्याची भूमिका घेऊ असेही यावेळी सांगितले.