साताऱ्यातील महादरे तलावात एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 14:48 IST2020-09-21T14:47:29+5:302020-09-21T14:48:43+5:30
सातारा शहरापासून जवळच असलेल्या महादरे तलावामध्ये रविवारी रात्री एकाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

साताऱ्यातील महादरे तलावात एकाची आत्महत्या
सातारा: शहरापासून जवळच असलेल्या महादरे तलावामध्ये रविवारी रात्री एकाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
विजय प्रताप गुजर (वय ५०, रा. अंबवडे बुद्रुक ता. सातारा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास महादरे तलावमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला याची माहिती दिली. त्यानंतर रेस्क्यू टीमचे जवान तत्काळ तलावर पोहोचले. या जवानांनी संबंधित व्यक्तीचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. मृतदेहाच्या खिशामध्ये चिठ्ठी आढळून आली असून त्यामुळेच मृतदेहाची ओळख पटली. हा मृतदेह विजय गुजर यांचा असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना या घटनेची कल्पना दिली. गुजर यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आलेले नसून सातारा तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला नव्हता.