Satara Crime: मोराच्या शिकारप्रकरणी एक ताब्यात; मृत मोर, लांडोरसह छर्रा बंदूक जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 17:58 IST2025-08-27T17:57:37+5:302025-08-27T17:58:01+5:30
चौकशीवेळी त्याने दोन साथीदारांची नावे सांगितली

Satara Crime: मोराच्या शिकारप्रकरणी एक ताब्यात; मृत मोर, लांडोरसह छर्रा बंदूक जप्त
मलकापूर : मोरासह लांडोरीची शिकार केल्याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. तुळसण-ओंड रस्त्यालगत वनविभागाने ही धडक कारवाई केली. या कारवाईत मृत मोर, लांडोर, छर्रा बंदूक दुचाकी जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल ललिता पाटील यांनी दिली.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार कोळे, कासारशिरंबे व म्हासोली वनरक्षक रविवारी रात्रगस्त घालत होते. गस्तीवर असताना तुळसण ओंड रस्त्यालगतच्या शेतामध्ये अंधारात छर्रा बंदुकीचा आवाज आला. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, मोर व लांडोर याची शिकार झाल्याचे दिसून आले. त्याठिकाणाहून पळून जात असताना पाठलाग केला. मात्र अंधाराचा फायदा घेऊन आरोपीनी साहित्य व मुद्देमाल जागेवर टाकून तेथून पोबारा केला. त्या ठिकाणी मृतावस्थेतील मोर, लांडोर छर्रा बंदूक, दुचाकी घटनास्थळावरून मुद्देमाल मिळून आला. तो वनविभागाकडून ताब्यात घेण्यात आला.
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे अन्वये गुन्हा नोंद केला आहे. वनविभागाकडील श्वान पथकाच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला असता संशयित आरोपी सुधीर सर्जेराव पाटील (रा. उंडाळे, ता. कराड ) याच्या राहत्या घरापर्यंत श्वान पोहचला. त्यामुळे सदर आरोपीस चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. चौकशीवेळी त्याने दोन साथीदारांची नावे सांगितली. त्याने दिलेल्या माहितीवरून अमित चौगुले व रवि पावणे (रा. कुंडल ता. पलूस जि. सांगली) या फरार संशयित आरोपींचा पुढील तपास सुरू असून, वनक्षेत्रपाल कराड व कोळे वनपाल तपास करीत आहेत.
ही कारवाई सातारा उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक जयश्री जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली कराड वनक्षेत्रपाल ललिता पाटील, कोळे वनपाल दिलीप कांबळे, म्हासोली वनरक्षक संतोष पाटील, कासारशिरंबे वनरक्षक दशरथ चिट्टे, कोळे वनरक्षक अभिनंदन सावंत यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.