घरात चोर शिरल्याचे पाहून वृद्ध दाम्पत्य हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 18:52 IST2019-08-14T18:50:08+5:302019-08-14T18:52:12+5:30
मध्यरात्री घरात चोर शिरल्याचे समोर दिसत आहे. पण चोरट्यांना शिवीगाळ करण्यापलीकडे दाम्पत्याला काहीच करता आले नाही. त्यांच्या डोळ्यांदेखत घरातील १३ तोळे सोन्याचे दागिने आणि एक लाखाची रोकड चोरून नेल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील विलासपूरमध्ये मंगळवारी घडली.

घरात चोर शिरल्याचे पाहून वृद्ध दाम्पत्य हतबल
सातारा : मध्यरात्री घरात चोर शिरल्याचे समोर दिसत आहे. पण चोरट्यांना शिवीगाळ करण्यापलीकडे दाम्पत्याला काहीच करता आले नाही. त्यांच्या डोळ्यांदेखत घरातील १३ तोळे सोन्याचे दागिने आणि एक लाखाची रोकड चोरून नेल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील विलासपूरमध्ये मंगळवारी घडली.
शहराच्या उपनगरातील विलासपूरमध्ये वसंतराव हणमंत जाधव (वय ७६) हे सेवानिवृत्त शिक्षक हे पत्नीसमवेत राहत आहेत. त्यांची मुले पुणे येथे नोकरीला आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास त्यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा उचकटून दोन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी त्यांना अचानक जाग आली. मात्र, तोपर्यंत चोरट्यांनी घरातील तेरा तोळ्यांचे दागिने आणि एक लाखाची रोकड चोरली होती.
दोन चोरटे जाधव यांच्यापासून काही अंतरावर होते. जाधव यांनी चोरट्यांना शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांकडून हल्ला होण्याची शक्यता असल्यामुळे ते पुढे जाण्यास धजावले नाहीत. त्यांनी आरडाओरड सुरू केल्यामुळे चोरट्यांनी ऐवज घेऊन पलायन केले.
घाबरलेल्या जाधव दाम्पत्याने हा प्रकार सकाळ होईपर्यंत कोणालाही सांगितला नाही. सकाळी आठच्या सुमारास त्यांनी पुणे येथे कामानिमित्त वास्तव्यास असणाऱ्या आपल्या दोन मुलांना या प्रकाराची माहिती दिली. दुपारी बाराच्या सुमारास मुले पुण्याहून साताऱ्यात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जाधव यांच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही संशयास्पद वस्तू सापडतायत का? हे पोलिसांनी पाहिले; मात्र पोलिसांना काहीही सापडले नाही. या चोरीच्या प्रकारामुळे वृद्ध दाम्पत्य घाबरून गेले आहे. विलासपूरमधील काहीजणांच्या घरासमोर असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासले जात आहेत.