Satara: शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश; माणमधील शेतीपंपासाठी सलग आठ तास वीज, अधिकाऱ्यांचे आश्वासन
By नितीन काळेल | Updated: March 12, 2025 19:34 IST2025-03-12T19:33:39+5:302025-03-12T19:34:12+5:30
सातारा : महावितरणच्या चुकीच्या कारभाराविरोधात माण तालुक्यातील शेतकऱ्यांनी साताऱ्यात अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरच उपोषणाला सुरुवात केली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने ...

Satara: शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश; माणमधील शेतीपंपासाठी सलग आठ तास वीज, अधिकाऱ्यांचे आश्वासन
सातारा : महावितरणच्या चुकीच्या कारभाराविरोधात माण तालुक्यातील शेतकऱ्यांनी साताऱ्यात अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरच उपोषणाला सुरुवात केली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने शेतीपंपांना सलग आठ तास वीजपुरवठा, शेनवडी उपकेंद्रात दुप्पट क्षमतेचा ट्रान्सफाॅर्मर उभारु अशी लेखी आश्वासने दिले. त्यानंतरच माणमधील शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
माण तालुक्यात महावितरणच्या कारभाराबद्दल जनतेत रोष आहे. तसेच शेतकऱ्यांनाही या कंपनीचा फटका बसत आहे. यासाठी माणमधील शेतकरी साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी कृष्णानगर येथील महावितरण अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरच उपोषणाला सुरूवात केली. त्यामुळे महावितरणचे प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांसोबत तातडीने चर्चा केली. तसेच काही मागण्या लेखी स्वरुपात मान्य केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी आमरण उपोषण स्थगित केले.
शेतीपंपांना नवीन वीज जोडणी देण्याबाबतची मागणी वरिष्ठ कार्यालयास सादर करू, शेनवडी उपकेंद्राच्या अखत्यारित शेतीपंपांना योग्य दाबाने वीजपुरवठा करण्यात येईल, दीड माहिन्यात शेनवडी उपकेंद्रात असणारा पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलून दुप्पट क्षमतेचा करू, शेतीपंपांना सलग आठ तास नियमित वीजपुरवठा होईल याची दक्षता घेऊ, असे लेखी पत्र महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिले आहे.
यावेळी महेश करचे, अतुल झिमल, अण्णा व्हरकाटे, शिवाजी काळेल, समाधान पुकळे, शिवाजी जाधव, विजय झिमल, आबा पिसाळ, मधुकर कोळेकर, भारत काळेल यांच्यासह माण तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर यादरम्यान आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता.