"आता, दिल्लीतून आदेशाची वाट पाहणार नाही"; उदयनराजे समर्थक शिवतिर्थवर जमले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 05:10 PM2024-03-15T17:10:20+5:302024-03-15T17:11:55+5:30

भाजपचे लोकसभा मतदारसंघ संयोजक सुनील काटकर यांनी शुक्रवारपर्यंत वाट पाहू व त्यानंतर आपण एकमताने निर्णय घेऊ, अशी भूमिका जाहीर केली होती.

"Now, no more waiting for orders from Delhi"; Supporters of Udayanaraje bhosale gathered at Shivatirtha for loksabha Ticket | "आता, दिल्लीतून आदेशाची वाट पाहणार नाही"; उदयनराजे समर्थक शिवतिर्थवर जमले

"आता, दिल्लीतून आदेशाची वाट पाहणार नाही"; उदयनराजे समर्थक शिवतिर्थवर जमले

मुंबई  - भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी तर महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपाच्या दुसऱ्या यादीत काही नव्या उमेदवारांना संधी देण्यात आली असून पंकजा मुंडेंनाही भाजपाने लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. मात्र, २० उमेदवारांच्या महाराष्ट्रातील पहिल्या यादीत साताऱ्यातील भाजपा नेते आणि खासदार खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव नसल्याने उदयनराजेंचे समर्थक आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यातील अनेक भाजपा पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामेही देऊ केले आहेत.

भाजपचे लोकसभा मतदारसंघ संयोजक सुनील काटकर यांनी शुक्रवारपर्यंत वाट पाहू व त्यानंतर आपण एकमताने निर्णय घेऊ, अशी भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे, कार्यकर्ते शांत झाले. पण, आज पुन्हा एकदा उदयनराजेंचे समर्थक आक्रमक झाले असून साताऱ्यातील शिवतिर्थवर एकत्र येत त्यांनी भूमिका जाहीर केली. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे मतदारसंघ कोणाच्या ताब्यात जाणार हे निश्चित नाही. अशातच भाजपने लोकसभा उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र, त्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळे, ही जागा भाजपाऐवजी इतर पक्षाला जाईल, अशी चर्चा साताऱ्यात होत आहे. त्यातूनच, उदयनराजे समर्थक आक्रमक झाले आहेत. 

''साताऱ्याचे राजे उदयनराजे यांना भाजपाकडून अद्याप लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं नाही. याच, साताऱ्यातून दिल्लीला आदेश जात होते. आता, दिल्लीतून साताऱ्याला आदेश येण्याची वाट आम्ही पाहणार नाही,'' असे म्हणत उदयनराजेंच्या समर्थनार्थ कार्यकर्ते साताऱ्यातील शिवतिर्थवर एकत्र जमले आहेत. यावेळी, उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर न झाल्याने संताप व्यक्त करत, आम्ही म्हणजेच साताऱ्यातील जनतेनं, येथील अठरा पगड जातीनं महाराजांची उमेदवारी जाहीर केली आहे. आता, एकच नारा, अब की बार, महाराष्ट्रातून हद्दपार असे म्हणत साताऱ्यातील उदयनराजे समर्थक आजही आक्रमक झाल्याचं दिसून आलं. 

दरम्यान, महायुतीतील जागावाटपात साताऱ्याची जागा नेमकं कोणाला जाणार हेही अद्याप निश्चित झालं नाही. मात्र, साताऱ्यातील जागेसाठी अजित पवार गट आक्रमक असून अजित पवार गटाकडून रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. 

शासकीय विश्रामगृहावरही झाली बैठक

सातारा मतदारसंघ भाजपने घेऊन उदयनराजे यांना उमेदवारी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे दोन याद्यांनंतरही उदयनराजेंचे नाव जाहीर न झाल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शासकीय विश्रामगरावर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण केले जाते. पण, त्यांच्या वंशजांना उमेदवारी डावलली जाते हे आम्ही सहन करणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. 
 

Web Title: "Now, no more waiting for orders from Delhi"; Supporters of Udayanaraje bhosale gathered at Shivatirtha for loksabha Ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.