आता घरबसल्या मिळवा डिजिटल स्वाक्षरीचा दस्त; मुद्रांकच्या ‘ई-प्रमाण’ प्रणालीचा पहिल्या टप्प्यात साताऱ्यात प्रयोग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 14:10 IST2025-09-18T14:10:07+5:302025-09-18T14:10:27+5:30
व्यवहार होणार सुरक्षित

आता घरबसल्या मिळवा डिजिटल स्वाक्षरीचा दस्त; मुद्रांकच्या ‘ई-प्रमाण’ प्रणालीचा पहिल्या टप्प्यात साताऱ्यात प्रयोग सुरू
सातारा : मुद्रांक विभागाने ‘ई-प्रमाण’ ही नवी संगणकप्रणाली विकसित केली असून, त्याद्वारे दुय्यम निबंधकांची स्वाक्षरी असलेला डिजिटल दस्त आता नागरिकांना घरबसल्या उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नवीन आणि जुने दस्त घेण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज लागणार नाही. सातारा जिल्ह्यात बुधवारपासून पहिल्या टप्प्यात हा प्रयोग सुरू झाला आहे.
नोंदणी मुद्रांक विभागाच्या वेबसाइटवरील ‘ई-सर्च’द्वारे जुने दस्त उपलब्ध होत होते. मात्र, ते कायदेशीर म्हणून ग्राह्य धरले जात नव्हते. त्याकरिता पुणे शहराचे सहजिल्हा निबंधकांनी डिजिटल स्वाक्षरी असलेले दस्त उपलब्ध करण्याचा प्रयोग यशस्वी केला. त्याच धर्तीवर नोंदणी मुद्रांक विभागाने संगणक प्रणालीत बदल करून ‘ई-प्रमाण’ ही नवी प्रणाली विकसित केली आहे. त्या प्रणालीच्या आधारे आता डिजिटल स्वाक्षरीयुक्त असलेल्या दस्तांच्या प्रती नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.
या सुविधेमुळे दस्ताच्या प्रत्येक पानावर दुय्यम निबंधकाची डिजिटल सही असले. ‘ग्रीन टीक’ किंवा ‘डिजिटल टीक’द्वारे दस्तांची कायदेशीर मान्यता तपासता येणार आहे.
सेवा पंधरवड्यात नावीन्यपूर्ण उपक्रम
‘ई-प्रमाण’ प्रणालीद्वारे नोंदणीकृत दस्ताची डिजिटल स्वाक्षरी असलेली प्रत नागरिकांना घरबसल्या संदेशाद्वारे किंवा ‘लॉग-इन’मध्ये मिळणार आहे. नोंदणी मुद्रांक विभागाच्या वेबसाइटवरील ‘ई-सर्व्हिसेस’च्या माध्यमातून अर्जावर आणि आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून केलेल्या सर्व अर्जावर दुय्यम निबंधक हे एकत्रितपणे डिजिटल स्वाक्षरी करणार आहेत. राज्य सरकारच्या सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत नागरिकांना घरबसल्या नोंदणीकृत दस्ताची डिजिटल प्रत मिळणार आहे.
व्यवहार होणार सुरक्षित
ई-प्रमाण या संगणक प्रणालीमुळे दस्त पाठविणाऱ्यास प्रमाणीकरण करता येणार आहे. स्वाक्षरीनंतर दस्तात कोणताही बदल नाही, याची खात्री मिळू शकणार आहे. एन्क्रिप्शन तंत्रज्ञानावर आधारित आणि सुरक्षित व्यवहार होणार आहे.
प्रत्येक पानावर डिजिटल स्वाक्षरी
या सुविधेमुळे प्रत्येक पानावर निबंधकाची डिजिटल स्वाक्षरी असेल. ग्रीन टीक किंवा ‘डिजिटल टीक’द्वारे दस्त तपासता येईल. यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. कार्बन फूटप्रिंट कमी करून पर्यावरणाला हातभार लागणार आहे. संदेशाद्वारे नागरिकांना डाउनलोड लिंक मिळणार आहे.
एखाद्या मिळकतीचा दस्तऐवज कोणत्या कार्यालयात कोणत्या अनुक्रमांकाने नोंदला आहे, याची माहिती मिळाल्यानंतर त्याची प्रमाणित प्रत नागरिकांना घरबसल्या या सुविधेद्वारे घेता येईल. नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची गरज नाही. - संजय पाटील, सह. जिल्हा निबंधक वर्ग १