Satara: कराड पालिकेकडून २० हून अधिक हॉटेल्स, बार, लॉजला नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 15:26 IST2025-12-24T15:26:12+5:302025-12-24T15:26:32+5:30
गोव्यातील क्लबला लागलेल्या आगीनंतर फायर सेफ्टी ऑडिटवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले

Satara: कराड पालिकेकडून २० हून अधिक हॉटेल्स, बार, लॉजला नोटीस
कराड : गोव्यातील क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेच्यानंतर हॉटेल, बार, रेस्टॉरंटसह मोठ्या आस्थापना, दुकाने, रुग्णालये, मॉल्सच्या फायर सेफ्टी ऑडिटवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कराड शहरातील अनेक हॉटेल्स, रेस्टाॅरंट चालकांनी दोन वर्षांपासून आपले फायर ऑडिटच करून घेतले नसल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, मंगळवारी पालिकेच्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांकडून कराडातील संबंधित हॉटेल्स, बार रेस्टाॅरंटच्या ठिकाणी जाऊन तपासणी करण्यात आली. तसेच फायर ऑडिट करून घेण्याच्या नोटिसा देण्यात आल्या.
सातारा जिल्ह्यात नेहमीच पर्यटकांचा राबता असतो. ख्रिसमस, ३१ डिसेंबरला नववर्षाच्या स्वागताला लाखो पर्यटक जिल्ह्यात दाखल होतात. कुणी महाबळेश्वर, पाचगणी तर कुणी कोयनानगर येथे पर्यटनाचा बेत आखून कुटुंबासह दाखल होतात. यासाठी हॉटेल, रिसॉर्टचे आगाऊ बुकिंग केले जाते. सातारा जिल्ह्यात देखील मोठ्या संख्येने पर्यटक येत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही ख्रिसमस, थर्टी फर्स्टसाठी हॉटेल्समध्ये गर्दी वाढणार हे नक्की.
अनेक बार, रेस्टॉरंट, हॉटेल्स फायर ऑडिटविना
वर्षातून जानेवारी आणि जुलै महिन्यात दोनदा फायर ऑडिट तज्ज्ञांकडून करून घेणे आवश्यक आहे. मात्र, अनेक बार, हॉटेल व्यावसायिक याकडे कानाडोळा करतात. सातारा जिल्ह्यातही अनेक बार, हॉटेल्स ही फायर ऑडिटविना सुरू आहेत. तर कराड शहरात फायर ऑडिटविना सुरू असलेल्या बार, हॉटेल्सची पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करीत फायर ऑडिट करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
फायर सेफ्टी ऑडिट म्हणजे काय?
फायर सेफ्टी ऑडिट म्हणजे एखाद्या इमारत किंवा संस्थेतील आगीशी संबंधित धोके, अग्निसुरक्षा यंत्रणा (जसे की अलार्म, फायर एक्स्टिंग्विशर, एक्झिट) आणि आपत्कालीन तयारीची तपासणी व मूल्यांकन करण्याची एक पद्धतशीर प्रक्रिया आहे, ज्यामुळे संभाव्य धोके ओळखून ते टाळता येतात आणि कायद्याचे पालन होते, तसेच जीवित व वित्तहानी टाळता येते.
अरुंद ठिकाणी व्यवसाय, बंद जागेत कुकिंग
सातारा जिल्ह्यात हजारो हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट आहेत. अनेक हॉटेल ही अरुंद ठिकाणी आहेत. हॉटेलमध्ये कुकिंगची जागा ही बंद जागेत असते. त्यामुळे हवे तसे व्हेंटिलेशन होत नाही. अशावेळी आग लागण्याची शक्यता अधिक असते.
ख्रिसमस, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातील अनेक हॉटेल्स, बार रेस्टाॅरंटमध्ये आगीची दुर्घटना घडू नये यासाठी मंगळवारी कराड शहरातील वीस हॉटेल्स, बार रेस्टाॅरंटची पाहणी करीत संबंधितांनी फायर ऑडिट करून घेण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. - श्रीकांत देवघरे, कराड अग्निशमन अधिकारी