सातारा जिल्ह्यात उमेदवारी अर्जाची पाटी पहिल्या दिवशी कोरीच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 12:11 IST2025-11-11T12:10:31+5:302025-11-11T12:11:32+5:30
Local Body Election: नऊ पालिकांमध्ये एकही अर्ज दाखल नाही

सातारा जिल्ह्यात उमेदवारी अर्जाची पाटी पहिल्या दिवशी कोरीच!
सातारा : नगरपालिका व नगरपंचायतीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. मात्र, पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्जाची पाटी कोरी राहिली. जिल्ह्यातील नऊ पालिकांमध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, मलकापूर, रहिमतपूर, म्हसवड, फलटण, वाई, पाचगणी, महाबळेश्वर या नऊ नगरपालिका व मेढा नगरपंचायतीसाठी २ डिसेंबरला मतदान, तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. इच्छुकांना १७ नोव्हेंबरपर्यंत आपले अर्ज दाखल करता येणार आहे.
यंदा महायुती व महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने पहिल्या दिवशी अनेक उमेदवार आपला अर्ज दाखल करतील, अशी आशा होती. मात्र, उमेदवारांना निरुत्साह दिसून आला. कागदपत्रांची पूर्तता करण्याची अनेकांची धावपळ सुरू असल्याने अनेकांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. त्यामुळे जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही.
साताऱ्यातही अर्ज नाही
सातारा पालिकेच्या ५० जागांसाठी यंदा राजकीय पक्ष व अपक्षांनी दंड थोपटले आहेत. सोमवारी भाजपकडून पालिकेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामुळे सातारा पालिकेसाठी सोमवारी एकही अर्ज दाखल झाला नाही.