नवविवाहितेची आत्महत्या; सासूचा आत्महत्येचा प्रयत्न, साताऱ्यातील विंग येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 17:40 IST2023-06-26T17:39:51+5:302023-06-26T17:40:30+5:30
सासरच्या दारात अंत्यसंस्कार करण्याचा नातेवाइकांचा पवित्रा

नवविवाहितेची आत्महत्या; सासूचा आत्महत्येचा प्रयत्न, साताऱ्यातील विंग येथील घटना
कऱ्हाड : राहत्या घरातील स्वयंपाकगृहात नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर सुनेच्या आत्महत्येनंतर सासूने हाताच्या नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना कऱ्हाड तालुक्यातील विंग येथे रविवारी घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नवविवाहितेच्या माहेरच्या नातेवाइकांनी सासरच्या घरासमोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा पवित्रा घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.
नीलम अनिकेत माने (वय २१) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे, तर सासू राणी अंकुश माने (वय ३४) हिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड येथील नीलम हिचा तीन महिन्यांपूर्वी विंग येथील अनिकेत माने याच्याशी विवाह झाला होता. शनिवारी रात्री नीलम ही स्वयंपाकगृहात झोपली होती, तर पती अनिकेत, सासू राणी माने व सासरा अंकुश माने हे तिघे जण बाहेरच्या खोलीत झोपले होते. रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास नीलम दरवाजा उघडत नसल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडून स्वयंपाकगृहात प्रवेश केला. त्यावेळी नीलमने पत्र्याच्या अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. ही घटना पाहून सासू राणी माने हिने दोन्ही हाताच्या नसा कापून घेत आमहत्येचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी तातडीने तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. तसेच घटना समजल्यानंतर मृत नीलमचे माहेरचे नातेवाईक कऱ्हाडात दाखल झाले. त्यांनी कऱ्हाड तालुका पोलिस ठाणे व उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती.
नीलमच्या मृतदेहावर तिच्या सासरच्या दारात अंत्यसंस्कार करण्याची मागणी नातेवाइकांनी केली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्यात येत होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिसात सुरू होती.