प्रतिष्ष्ठेच्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी; मकरंद पाटील यांचा करिष्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 10:21 PM2021-10-19T22:21:46+5:302021-10-19T22:22:00+5:30

खंडाळा साखर कारखाना निवडणूक

NCP's lead in the battle for prestige; The charisma of NCP MLA Makrand Patil | प्रतिष्ष्ठेच्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी; मकरंद पाटील यांचा करिष्मा

प्रतिष्ष्ठेच्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी; मकरंद पाटील यांचा करिष्मा

googlenewsNext

- दशरथ ननावरे

खंडाळा : खंडाळा कारखान्याच्या निवडणुकीत शह-काटशहच्या राजकारणाने तालुक्याचे वातावरण ढवळून निघाले होते. कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे यांच्या नेतृत्वाखालील बाळसिद्धनाथ संस्थापक पॅनलसाठी ही अस्तित्वाची लढाई होती तर आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास परिवर्तन पॅनलने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या या निवडणुकीत राजकीय संघर्ष टोकाला गेला होता. मात्र सरतेशेवटी शेतकरी विकास परिवर्तन पॅनलने सर्व जागा जिंकून संस्थापक पॅनलला धोबीपछाड देत धुव्वा उडवला.

खंडाळ्याच्या माळरानावर तालुक्यातील शेतक-यांच्या मालकीचा साखर कारखाना उभा राहावा ही सर्वांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संस्थापकांनी अखंड मेहनत घेतली. अनेक अडचणींची शर्यत पार करून तो कार्यान्वित झाला. मात्र माजी आमदार मदन भोसले व विद्यमान अध्यक्ष शंकरराव गाढवे यांच्या नेतृत्वाखाली तो सक्षमपणे चालविण्यात सत्ताधारी गटाला यश आले नसल्याने शेतक-यांच्या हितासाठी कार्यान्वित झालेला कारखाना हळूहळू आर्थिक गर्तेत अडकत गेला आणि त्यात तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला असल्याची भावना लोकांच्यात उमटली. शेतकरी हिताची भूमिका पुढे करीत आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी गटाने पॅनल उभे करून हे युनिट सुरळीत चालू करण्याची व सक्षमपणे चालविण्याची हमी देत परिवर्तनाची साद घातली.

वास्तविक स्थापनेपासून बिनविरोध होत राहिलेला कारखाना आत्ताही बिनविरोध करून कारभाराची घडी पुन्हा बसवावी यासाठी सत्ताधारी संस्थापक पॅनलने प्रयत्न केले होते. दोन्ही गटात उपाध्यक्ष व्ही. जी. पवार हे मध्यस्थीची भूमिका घेत होते. मात्र जागा वाटपाचे तंत्र अयशस्वी झाले आणि स्वत: उपाध्यक्ष विरोधी गोटात सामील झाले. त्यापाठोपाठ आणखी तीन संचालकांनी राष्ट्रवादी प्रणित पॅनलचा रस्ता धरला. त्यामुळे संस्थापक पॅनलला ऐनवेळी उमेदवार बदलावे लागले. दुस-या बाजूला आमदारांनी दुरावलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पॅनलमध्ये समाविष्ट केले. कारखाना उभारणीचे योगदान लोकांच्या मनात कायम राहिले; पण प्रचाराच्या रणधुमाळीत मदन भोसले यांच्या कारभारावरील नाराजी प्रकर्षाने उमटली. याउलट कारखान्याची घडी आमदार मकरंद पाटील हेच बसवू शकतात. याचा ठसा उमटविण्यात परिवर्तनला यश आले.

योगदानाचा मतदारांना विसर-

कारखाना उभारणीसाठी पंचवीस वर्षे अध्यक्ष शंकरराव गाढवे यांनी खस्ता खाल्ल्या. प्रत्यक्ष शेअर्स जमा करणे, कायदेशीर बाबी पूर्ण करणे, रचनात्मक काम करणे यासाठी मोठे योगदान देऊन माळरानावर नंदनवन फुलविले. मात्र निवडणुकीत या सर्व बाबींच्या पारड्यापेक्षा कारखाना सुरू होण्याचे पारडे जड ठरले. योगदानाचे महत्त्व आणि त्यासाठीचे परिश्रम याचा मतदारांना विसर पडल्याचे दिसून आले; मात्र त्यांच्या प्रामाणिक योगदानाला आणि पारदर्शक निष्ठेला तोड नाही, हे तितकेच खरं आहे.

आधे इधर.. आधे उधर..-

कारखाना निवडणुकीत दोन्ही पॅनलने पक्षीय झेंडे बाजूला ठेवले होते. त्यामुळे समविचारी प्रमुखांची त्यांना साथ मिळाली. यात काँग्रेस पक्षात दुफळी होऊन उपसभापती वंदना धायगुडे पाटील, तालुकाध्यक्ष एस. वाय. पवार, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत ढमाळ, प्रकाश गाढवे हे परिवर्तनच्या गोटात सामील झाले; तर युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, तालुकाध्यक्ष अतुल पवार व सहकाऱ्यांनी संस्थापकांना साथ दिली.

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे, आदेश जमदाडे यांनी परिवर्तनला सहकार्य केले, तर विधानसभा संघटक प्रदीप माने यांनी संस्थापकांची बाजू घेतली. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आधे इधर.. आधे उधर.. अशी राहिली. कारखाना उभारणीचे योगदान लोकांच्या मनात कायम राहिले; पण प्रचाराच्या रणधुमाळीत मदन भोसले यांच्या कारभारावरील नाराजी प्रकर्षाने उमटली. त्यातच कारखाना चालू करण्याची हमी देण्यात संस्थापकांना अपयश आले. याउलट कारखान्याची घडी आमदार मकरंद पाटील हेच बसवू शकतात. याचा ठसा उमटविण्यात परिवर्तनला यश आले तसेच आमदारांचे गावोगावी असणारे संघटन आणि जनसंपर्क परिवर्तनच्या फायद्याचे ठरले.

पराभव अनेकांच्या जिव्हारी-

कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी दैवत आहेत. तालुक्याची अस्मिता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे त्यांच्या विषयी नेहमीच आदराची भावना राहिली आहे; पण तरीही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला असून, तालुक्याचा स्वाभिमान घालविल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

राजकारणातील दबदबा पुन्हा सिध्द-

आमदार मकरंद पाटील यांनी संपूर्ण निवडणुकीची सूत्रे स्वत:च्या हाती ठेवली होती. गावोगावचे संघटन आणि लोकांचा विश्वास या जमेच्या बाजू ठरल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबर सहकार क्षेत्रातही त्यांचे आगमन दमदार ठरले. त्यामुळे राजकारणात त्यांचा करिश्मा असल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे.

संस्थापक पँनेलचे उमेदवार व मते-

शंकरराव गाढवे - २५४३, अशोकराव ढमाळ - २२२४, रवींद्र ढमाळ - २१९९, चंद्रकांत यादव - २१९०, संजय पानसरे - २२५४, साहेबराव महांगरे - २३३३, नारायणराव पवार - २२८१, विशाल धायगुडे - २३८७, संजय गायकवाड - २१९२, महादेव भोसले - २३१५, मनोज पवार - २२७६, श्रीपाद देशपांडे - २२५७, पुरुषोत्तम हिंगमिरे - २२४८, प्रदीप क्षीरसागर - २२१३, बापूराव धायगुडे - २३९७, अनिता भोसले - २७१३, इंदुमती पाटील - २५३७, दिनकर राऊत - २८२३, उत्तम धायगुडे - २८०७, भरत जाधव - २६४१, संजीव ऊर्फ अनिरुध्द गाढवे - ३६९, अपक्ष - संतोष देशमुख - ७७.

Web Title: NCP's lead in the battle for prestige; The charisma of NCP MLA Makrand Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.