भल्याभल्यांची राजकीय कोंडी करणारे शरद पवार खोलीत अडकतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 11:34 IST2018-05-09T11:26:52+5:302018-05-09T11:34:02+5:30

सभागृहाचा दरवाजा उघडत नसल्यानं पवार अडकले

ncp chief sharad pawar stuck in meeting hall | भल्याभल्यांची राजकीय कोंडी करणारे शरद पवार खोलीत अडकतात तेव्हा...

भल्याभल्यांची राजकीय कोंडी करणारे शरद पवार खोलीत अडकतात तेव्हा...

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सभागृहात अडकून पडल्याचा प्रकार घडला. रयत शिक्षण संस्थेच्या पत्रकार परिषदेसाठी पवार साताऱ्यात आले असताना ही घटना घडली. सभागृहाचा दरवाजा उघडत नसल्यानं पवार पत्रकारांसह 10 मिनिटं अडकले होते. यावेळी दरवाजा उघडण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू होते. अखेर 10 मिनिटांनी दरवाजा उघडला आणि पवार सभागृहाबाहेर पडले.

रयत शिक्षण संस्थेच्या पत्रकार परिषदेसाठी शरद पवार साताऱ्यात आले होते. पत्रकार परिषद संपताच शरद पवार सभागृहातून बाहेर जाण्यास निघाले. मात्र दरवाजा उघडत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर दरवाजा उघडण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू झाले. मात्र जवळपास 10 मिनिटं दरवाजा उघडलाच नाही. यावेळी शरद पवार शांतपणे दरवाजा उघडण्याची वाट पाहत होते. 'राज्याचे दरवाजे कधी उघडणार?' अशी गमतीशीर चर्चा यावेळी पवारांसह अडकून पडलेल्या लोकांमध्ये सुरू झाली. ही चर्चा ऐकताच पवारांनी मिश्किल हास्य केलं. दरम्यान दरवाजा उघडत नसल्यानं तो तोडण्याची तयारी सुरू झाली होती. मात्र तितक्यात बाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांना दरवाजा उघडण्यात यश आलं आणि भल्याभल्यांची राजकीय कोंडी करणाऱ्या शरद पवारांची सुटका झाली. 

Web Title: ncp chief sharad pawar stuck in meeting hall