Panchgani Municipal Council Election Results 2025: पाचगणीचा नगराध्यक्ष अवघ्या दोन मतांनी विजयी, राष्ट्रवादीने पुन्हा काबीज केली सत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 16:04 IST2025-12-22T16:03:22+5:302025-12-22T16:04:05+5:30
Panchgani Nagar Palika Election Results 2025: मंत्री मकरंद पाटील यांनी लक्ष्मी कऱ्हाडकर यांना दिला धक्का

Panchgani Municipal Council Election Results 2025: पाचगणीचा नगराध्यक्ष अवघ्या दोन मतांनी विजयी, राष्ट्रवादीने पुन्हा काबीज केली सत्ता
पाचगणी : पाचगणी गिरीस्थान नगरपालिकेच्या निवडणुकीत काही धक्कादायक निकाल लागून राष्ट्रवादीने लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या सत्तेला थांबवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने पाचगणीत पुन्हा सत्ता काबीज केली आहे. नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप बगाडे यांनी कऱ्हाडकर यांचे उमेदवार संतोष कांबळे यांचा केवळ दोन मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे पाचगणी पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता स्थापित झाली आहे.
सत्तेची गोळाबेरीज सध्या चालू असून राष्ट्रवादीला १२ तर लक्ष्मी कऱ्हाडकर यांचे ८ नगरसेवक असे बलाबल आहे. नगराध्यक्ष दिलीप बगाडे हे राष्ट्रवादी पुरस्कृत असल्याने मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी लक्ष्मी कऱ्हाडकर यांना सत्तेबाहेर ठेवण्यात यश संपादन केले आहे.
वाचा : साताऱ्यात भाजप ‘सिकंदर’ तर अपक्ष उमेदवार ‘धुरंधर’!, पालिकेत शिंदेसेनेचीही झाली एंट्री
गेले १५ वर्षाचा राष्ट्रवादीचा राजकीय वनवास संपुष्टात आला आहे. यावेळी पोलिस बंदोबस्तासाठी दोन अधिकारी, २७ पोलिस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा कर्मचारी ६, होमगार्ड ५० असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दोन जोडपे पालिकेत
या निवडणुकीत प्रकाश गोळे आणि अमृता गोळे तसेच वैभव कऱ्हाडकर आणि अभिलाषा कऱ्हाडकर या दोन श्री आणि सौ आता पालिकेत प्रवेश करणार आहेत.
आमदार मकरंद पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांचे मार्गदर्शन आणि साथीने आपण यशस्वी ठरलो असून यापुढे सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन आम्ही पाचगणीच्या विकासासाठी कटिबद्ध राहू. राष्ट्रवादीच्या माध्यमातून आता स्वच्छ सुंदर पाचगणी ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे यांनी सांगितले. - दिलीप बगाडे, विजयी नगराध्यक्ष