मुलाची लग्नपत्रिका वाटताना आईचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 18:31 IST2019-05-21T18:30:27+5:302019-05-21T18:31:29+5:30
मुलाची लग्नपत्रिका वाटावयास गेलेल्या दाम्पत्याची दुचाकी मेटगुताडजवळ आली असता घसरली. या दुर्घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून, पती गंभीर जखमी आहे. अपघाताची माहिती समजताच खर्शी गावात शोककळा पसरली. हा अपघात शनिवारी दुपारी झाला.

मुलाची लग्नपत्रिका वाटताना आईचा मृत्यू
पाचगणी : मुलाची लग्नपत्रिका वाटावयास गेलेल्या दाम्पत्याची दुचाकी मेटगुताडजवळ आली असता घसरली. या दुर्घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून, पती गंभीर जखमी आहे. अपघाताची माहिती समजताच खर्शी गावात शोककळा पसरली. हा अपघात शनिवारी दुपारी झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जावळी तालुक्यातील खर्शी बारामुरे येथील प्रकाश नारायण गावडे (वय ५४) व सुनीता (४८) हे दाम्पत्य मुलाच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी भिलार येथे नातेवाइकांकडे गेले होते. त्यानंतर ते बोंडारवाडी येथे गेले. तेथून नातेवाइकांना सांगून महाबळेश्वरकडे निघाले. ते दोघेही दुचाकीवरून मेटगुताड येथे एका धाब्याशेजारी आले. तेथे रस्त्याच्या कामासाठी इतरत्र पसरलेल्या वाळूवरून त्यांची दुचाकी घसरली.
यामध्ये दोघेही गाडीवरून पडले. मागे बसलेल्या सुनीता यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. यामध्ये दोघांनाही उपचारासाठी पाचगणीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु सुनीता यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रकाश गावडे याना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपल्या मुलाच्या लग्नापूर्वीच आईवर काळाने घाला घातल्याने मेटगुताड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कृष्णानदीच्या पात्रात बुडून वृद्धाचा मृत्यू
सातारा : आरळे, ता. सातारा गावच्या हद्दीतील कृष्णा नदीच्या पात्रात बुडून मारूती विठ्ठल कदम (वय ४०, रा. आरळे, ता. सातारा) यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. १७ रोजी दुपारी अडीच वाजता घडली.
मारूती कदम हे आंघोळ करण्यासाठी कृष्णा नदीच्या पात्रात उतरले होते. यावेळी त्यांना अचानक भोवळ आली. त्यामुळे त्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. हा प्रकार बऱ्याच उशिरानंतर स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. मात्र,तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.