मॉर्निंग वॉकला गेलेल्यांना कंटेनरने चिरडले, एक ठार एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 15:18 IST2018-04-08T15:18:20+5:302018-04-08T15:18:20+5:30
मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांना कंटेनरने धडक दिली. त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या येथील दत्त चौकात रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

मॉर्निंग वॉकला गेलेल्यांना कंटेनरने चिरडले, एक ठार एक गंभीर
क-हाड - मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांना कंटेनरने धडक दिली. त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या येथील दत्त चौकात रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुनील आनंदा माने (वय ५२, रा. गुरुवार पेठ, क-हाड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. तर गंभीर जखमी झालेल्या दशरथ महादेव सूर्यवंशी (७०, बुधवार पेठ, कºहाड) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गुरुवार पेठेत राहणारे सुनील माने व बुधवार पेठेतील दशरथ सूर्यवंशी हे दररोज पहाटे मॉर्निंग वॉकला जातात. रविवारी सकाळीही दोघे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. शहरात फेरफटका मारल्यानंतर घरी जाण्यासाठी दोघेही दत्त चौकात आले. यावेळी ओगलेवाडी बाजूकडे निघालेल्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरची सुनील व दशरथ यांना धडक बसली. कंटेनरचे चाक अंगावरून गेल्याने सुनील माने यांचा जागीच मृत्यू झाला. तर दशरथ सूर्यवंशी हे गंभीर जखमी झाले. अपघात निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी जखमी दशरथ सूर्यवंशी यांना उपचारार्थ सह्याद्री रुग्णालयात दाखल केले.
अपघाताची माहिती मिळताच क-हाड शहर पोलीस ठाण्याच्या अपघात विभागाचे अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी अपघात स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. अपघाताची नोंद कºहाड शहर पोलिसांत झाली आहे.