सातारा जिल्ह्यात मोदी आवासला सुरुवात; ५९४ घरकुलांना मान्यता

By नितीन काळेल | Published: November 30, 2023 07:19 PM2023-11-30T19:19:41+5:302023-11-30T19:20:25+5:30

वर्षात १७७७ बांधणार : इतर मागास अन् विशेष मागास प्रवर्गासाठी योजना 

Modi Awas Gharkul Yojana started in Satara district; Approval of 594 shelters | सातारा जिल्ह्यात मोदी आवासला सुरुवात; ५९४ घरकुलांना मान्यता

सातारा जिल्ह्यात मोदी आवासला सुरुवात; ५९४ घरकुलांना मान्यता

सातारा : जिल्ह्यात मोदी आवास घरकुल योजनेस सुरुवात झाली असून २०२३-२४ या वर्षात १ हजार ७७७ घरांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे. त्यातील ५९४ प्रस्तावांना मान्यता प्राप्त झाली आहे. इतर मागास आणि विशेष मागास प्रवर्गासाठी ही योजना आहे.

राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने मोदी आवास घरकुल ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. राज्य पुरस्कृत आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागातील इतर मागास, विशेष मागास प्रवर्गातील बेघर अथवा कच्चे घर असलेल्या कुटुंबांना या घरकुल योजनेचा लाभ दिला जात आहे. या अंतर्गत किमान २६९ चाैरस फूट चटई क्षेत्रफळाएेवढे पक्क्या घराचे बांधकाम करण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान लाभाऱ्श्यांच्या बॅंक खात्यात बांधकाम सुरू झाल्यावर चार टप्प्यात दिले जात आहे.

याशिवाय ९० दिवस अकुशल काम केल्यास रोजगार हमी योजने अंतर्गत २४ हजार ५७० रुपये मिळतात. तर लाभाऱ्थी कुटुंबाकडे पूर्वी शाैचालय नसल्यास किंवा या अनुदानाचा लाभ घेतला नसेल तर रोजगार हमी योजना अथवा स्वच्छ भारत मिशनमधून १२ हजार रुपये मिळतात. त्यामुळे सर्व मिळून लाभाऱ्श्यास १ लाख ५६ हजार ५७० रुपये निधी मिळत आहे.

सातारा जिल्ह्यास २०२३-२४ ते २५-२६ या कालावधीसाठी इतर मागास प्रवर्गासाठी ५ हजार ६१८ आणि विशेष मागास प्रवर्गाला ३०८ घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे. त्यातील २०२३-२४ साठी १ हजार ७७७ घरकुलाचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यात प्राप्त ५९४ प्रस्तावांना मान्यता मिळालेली आहे. उर्वरित प्रस्तावांना प्राप्त होताच मान्यता दिली जाणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पहिला टप्पा मान्यता प्रस्ताव..

तालुका - मंजूर घरकुले

  • जावळी ४८
  • कऱ्हाड ४६
  • खंडाळा ६५
  • खटाव ६०
  • महाबळेश्वर १७
  • माण १७५
  • पाटण ४१
  • फलटण ६३
  • सातारा ३४
  • वाई ४३

Web Title: Modi Awas Gharkul Yojana started in Satara district; Approval of 594 shelters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.