उमेदवारी देऊनही आमदार गेले शरद पवार गटासोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 13:28 IST2024-10-15T13:28:11+5:302024-10-15T13:28:54+5:30
चव्हाण यांच्यासोबत फलटणमधील जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, अनिकेतराजे नाईक-निंबाळकर यांनीही शरद पवार गटात प्रवेश केला.

उमेदवारी देऊनही आमदार गेले शरद पवार गटासोबत
फलटण (जि. सातारा) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी फलटण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेले आमदार दीपक चव्हाण यांनी सोमवारी शरद पवार गटात प्रवेश करत राजकीय धक्का दिला. चव्हाण यांच्यासोबत फलटणमधील जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, अनिकेतराजे नाईक-निंबाळकर यांनीही शरद पवार गटात प्रवेश केला.
यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, कोणत्याही व्यक्तीला स्वत:च्या बहिणीबद्दल आस्था असतेच. बहीण ही घरातील जिवाभावाची सर्वांत महत्त्वाची व्यक्ती असते. बहिणीचा सन्मान केला, तर मनापासून आनंद होतो; पण गेल्या दहा-वीस वर्षांत बहीण आठवली नाही. लोकसभेला आम्ही ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या त्यावेळी त्यांना बहीण आठवली.
ते म्हणाले, बारामतीतही एक बहीण उभी होती. बारामतीकर प्रचाराला गेले की, गप्प बसायचे. नेमके झाले काय?, असा प्रश्न पडत होता. मतमोजणी झाली, तेव्हा कळाले १ लाखापेक्षा जास्त मते बहिणीलासुद्धा दिली.
चुकीच्या लोकांच्या हातात हा महाराष्ट्र गेलेला आहे, तो पुन्हा दुरुस्त करण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही पवार म्हणाले.