अत्याचारातून अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती, युवकाला अटक; वाई तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 18:13 IST2022-04-19T18:02:52+5:302022-04-19T18:13:23+5:30
हा प्रकार कोणाला सांगितलास तर तुला आणि तुझ्या घरच्यांना ठार मारेन, अशी त्याने धमकी दिली. त्यामुळे त्या मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही.

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती, युवकाला अटक; वाई तालुक्यातील घटना
सातारा : निर्जन ठिकाणी नेत १७ वर्षांच्या मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आला. यातून पीडित मुलगी ७ आठवड्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकारानंतर वाई पोलिसांनी संबंधित तरूणाला अटक केली आहे. अभिषेक संतोष पाकिरे (रा. गडचीमाची, ता. वाई) असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अभिषेक पाकिरे याने १५ जानेवारी रोजी पीडित १७ वर्षीय मुलीला दुचाकीवरून एका निर्जन ठिकाणी नेले. त्याठिकाणी जबरदस्तीने अत्याचार केले. हा प्रकार कोणाला सांगितलास तर तुला आणि तुझ्या घरच्यांना ठार मारेन, अशी त्याने धमकी दिली. त्यामुळे त्या मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही.
परंतु काही दिवसांपूर्वी मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर घरच्यांनी तिला डाॅक्टरांकडे नेले. त्यावेळी ती मुलगी सात आठवडे चार दिवसांची गर्भवती असल्याचे समोर आले. या धक्कादायक प्रकारानंतर घरातल्यांनी वाई पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने पीडित मुलीचा जबाब घेऊन अभिषेक पाकिरे या युवकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.