निवडणुकांमध्ये सनसनाटी आणण्याचा केविलवाणा प्रयत्न, शंभूराज देसाई यांचा सुषमा अंधारे यांच्यावर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:47 IST2025-12-19T13:46:26+5:302025-12-19T13:47:52+5:30
ड्रग्ज प्रकरणात सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर केले गंभीर आरोप

निवडणुकांमध्ये सनसनाटी आणण्याचा केविलवाणा प्रयत्न, शंभूराज देसाई यांचा सुषमा अंधारे यांच्यावर आरोप
सातारा : सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सनसनाटी निर्माण करण्याचा उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश शिंदे यांचा सावरी प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही. शिंदे यांना बदनाम करण्याचा खटाटोप करण्याच्या प्रयत्नास न्यायालयाद्वारे तोडीस ताेड उत्तर देऊ, असा प्रतिटोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला.
सुषमा अंधारे यांनी सावरी प्रकरणाबाबत केलेल्या आरोपाला मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांसमोर प्रत्युत्तर दिले. देसाई म्हणाले, दोन वर्षांपूर्वी नाशिकमध्येही ड्रग्ज प्रकरण घडले, त्यावेळीही उत्पादन शुल्कमंत्री मी असल्याने माझ्यावर बेछुट आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी मी त्यांना ४८ तासांत आरोप मागे घ्या, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा दिला होता. ही कायदेशीर कारवाई पाटण न्यायालयात सुरू आहे. त्या स्वत: पाटण न्यायालयात हजर झाल्या होत्या. त्यानंतर आताही त्यांनी पुन्हा आरोप केले आहेत.
उपमुख्यमंत्री शिंदे आणि प्रकाश शिंदे यांचा सावरी, ड्रग्ज प्रकरणाचा दुरान्वयेही संबंध नाही. कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत; पण केवळ शिंदे यांचे नाव घेऊन सनसनाटी निर्माण करायची आणि स्वत:च्या पक्षात त्या कशा शिंदेसेनेला आणि एकनाथ शिंदे यांना डॅमेज करते, हे भासवण्याचा प्रयत्न करत आहेत.
...तर नाशिकसारखी पुन्हा न्यायालयीन कारवाई
देसाई यांच्या केसालाही मी घाबरत नाही, असे अंधारे यांनी वक्तव्य केले. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना त्यांच्याकडून न्यायालयाचा अवमान होतोय काय, याची त्यांनी खात्री करावी. त्यांनी जर वक्तव्य मागे घेतले नाही तर नाशिकसारखे या प्रकरणातही न्यायालयीन प्रक्रियेला त्यांना सामोरे जावे लागेल. शिंदे यांना बदनाम करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नास न्यायालयीन प्रक्रियेतून तोडीस तोड उत्तर देऊ, असा इशारा त्यांनी दिला.