Satara: कार वर्कशॉपला भीषण आग, आठ गाड्यांसह मशनरी जळून खाक; साडेतीन कोटींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 13:29 IST2025-10-17T13:29:20+5:302025-10-17T13:29:39+5:30
आग नेमकी कशी लागली हे अद्याप अस्पष्ट

Satara: कार वर्कशॉपला भीषण आग, आठ गाड्यांसह मशनरी जळून खाक; साडेतीन कोटींचे नुकसान
फलटण : फलटण-दहिवडी रस्त्यावर बुवासाहेब नगर कोळकी येथील ‘कार केअर’ या वर्कशॉपला गुरुवार (दि.१६) मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कार वर्कशॉप तसेच याठिकाणी दुरुस्तीसाठी आलेल्या आठ गाड्या जळून खास झाल्या. आगीत साडेतीन कोटींचे नुकसान झाले.
याबाबत माहिती अशी की, कोळकी येथील बुवासाहेब नगर येथे असलेल्या ‘कार केअर’ या वर्कशॉप मधून गुरुवारी रात्री उशिरा आगीचे, धुराचे लोट बाहेर येत असल्याचे नागरिकांना दिसले. नागरिकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.
वर्कशॉपमध्ये अंदाजे आठ गाड्या लावण्यात आल्या होत्या. ज्वलनशील पदार्थामुळे आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट दूरपर्यंत पसरले होते व मोठा आगीचा भडका उडाला. आगीत आठ गाड्या जळून खाक झाल्या. आग लागलेल्या ठिकाणी रहिवाशी भाग असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आगीची माहिती मिळताच फलटण नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाची गाडी जवानांसह घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन जवानांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला यश आले. आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तपासानंतरच आगीचे खरे कारण स्पष्ट होईल.